Tue, May 21, 2019 12:07होमपेज › Pune › पुणे : विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न

पुणे : विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न

Published On: Apr 29 2018 2:41AM | Last Updated: Apr 29 2018 2:27AMलोणीकंद : वार्ताहर 

वाघोली येथील रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकणार्‍या विद्यार्थिनीने महाविद्यालय इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न शनिवारी सकाळी 11 च्या सुमारास केला. विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर असून, तिच्यावर पुण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 

रश्मी प्रभू करनेवाड (वय 22, सध्या रा. रायसोनी कॉलेज हॉस्टेल, मूळगाव देवळाली, नाशिक) असे या  विद्यार्थिनीचे नाव आहे.

 शुक्रवारी रश्मी गावावरून हॉस्टेलमध्ये आल्यानंतर शनिवारी सकाळी तिचे फोनवर वाद चालू होते. 11 वाजण्याच्या सुमारास तिने मुख्य इमारतीचा चौथा मजला गाठला आणि साफसफाईसाठी उघड्या असलेल्या एका क्लासमध्ये शिरली. क्लासचा दरवाजा आतून बंद केला व मोबाईल बेंचवर ठेवत खिडकीचे दोन गज तुटलेल्या भागातून बाहेर झोकून दिले. 

रश्मी खाली पडल्यानंतर मोठा आवाज झाला असल्याने शेजारी असणार्‍या कामगारांनी शिक्षक व विद्यार्थ्यांना बोलावून तिला वाघोली येथील लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दोन्ही पाय फ्रॅक्चर व डोक्याला गंभीर इजा झाली असल्याने तिला पुण्यातील रुग्णालयात हलविण्यात आले.  तिच्यावर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत. रश्मी करनेवाड ही अत्यंत हुशार मुलगी आहे. उत्तम वक्तृत्व आणि महाविद्यालयातील कार्यक्रमांमध्ये अग्रेसर असणार्‍या रश्मीने अचानक असे पाऊल उचलल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. 

आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी ती फोनवर वाद घालत होती. सुरुवातीला तिने हॉस्टेलच्या इमारतीवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला होता. हॉस्टेलचा वरचा दरवाजा बंद असल्याने तिने महाविद्यालयात येऊन चौथ्या मजल्यावरून उडी मारली. नेमक्या कोणत्या कारणावरून तिने उडी मारली याचा तपास लोणीकंद पोलिस करीत आहेत.