Mon, Apr 22, 2019 16:29होमपेज › Pune › पुणे स्थानकावर लवकरच ‘वन रुपी क्‍लिनिक’

पुणे स्थानकावर लवकरच ‘वन रुपी क्‍लिनिक’

Published On: Feb 20 2018 1:55AM | Last Updated: Feb 20 2018 1:08AMपुणे : निमिष गोखले

पुणे रेल्वे स्थानकावर लवकरच ‘वन रुपी क्‍लिनिक’ सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रक्तदाब, मधुमेह आदी तपासण्या रेल्वे स्थानकावर मोफत करण्यात येणार असून, हायपर टेन्शन, व्यायाम आदी सल्ल्यांसाठी (कन्सल्टेशन) शुल्क म्हणून अवघा एक रुपया आकारण्यात येणार आहे. दरम्यान, मुंबईतील तब्बल 20 स्थानकांवर वन रुपी क्‍लिनिक यापूर्वीच सुरू असून मॅजिक डील (माय मेडिकल मंत्रा) या खासगी संस्थेकडून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पुणे स्थानकावर या पूर्वी दोनदा या संस्थेकडून हा प्रयोग राबविण्याबाबत पुणे विभागाला पत्र लिहिण्यात आले होते. मात्र त्या वेळी सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, असा आरोप करण्यात आला आहे. 

मॅजिक डील ही संस्था पुणे स्थानकावरही वन रुपी क्‍लिनिक हा उपक्रम राबविणार असून, रेल्वे त्यांना स्थानकावर मोफत जागा उपलब्ध करून देणार आहे. जागेचा खर्च वाचल्यामुळे रुग्णांना एक रुपयात सेवा देता येणार असल्याचे सांगण्यात आले. रेल्वेला यासाठी धोरण बनवावे लागणार आहे.  2019 अखेरपर्यंत तब्बल एक हजार स्थानकांवर हे ‘वन रुपी क्‍लिनिक’ सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही मिळाली आहे. राज्यातील बहुतांश स्थानकांचा या यादीत समावेश आहे. 

दरम्यान, देशभरातील तब्बल 7 हजार स्थानकांवर केंद्र सरकारकडून प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. रेल्वे मंत्रालयाने याबाबत विशेष योजना आखली आहे. त्याचप्रमाणे महिलांसाठी ‘सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशिन’ व जनऔषधी स्टोअर सुरू करण्याचा विचार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्या कार्यालयाने ट्विट करून ही माहिती दिली आहे. याबाबत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली म्हणाले की, सरकारच्या या योजनेचे आम्ही स्वागत करू, मात्र सरकारने योग्य अंमलबजावणी व देखभालीवर लक्ष दिले पाहिजे. लोकोपयोगी योजना सरकार सुरू करते, पण त्यानंतर त्याकडे पाहिजे तेवढे लक्ष दिले जात नाही.