Sun, May 19, 2019 22:01होमपेज › Pune › ब्लॉग : पुण्यात आमदार-नामदारांचे भाऊ आमने-सामने

ब्लॉग : पुण्यात आमदार-नामदारांचे भाऊ आमने-सामने

Published On: Feb 21 2018 1:27AM | Last Updated: Feb 21 2018 1:27AMपुणे : पांडुरंग सांडभोर

पुणे महापालिकेची आर्थिक नाडी असलेल्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी राज्याचे मंत्री दिलीप कांबळे आणि आमदार जगदीश मुळीक यांच्या भावांमध्ये कमालीची चुरस आहे. स्थायी समिती सदस्यांच्या नियुक्त्या झाल्याने आता अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याची चर्चा जोर धरू लागली आहे. भाजपमधून प्रबळ दावेदारांना स्थायीत संधीच मिळाली नसल्याने आता अध्यक्षपदासाठी दिलीप कांबळे यांचे बंधू सुनील तर आमदार जगदीश मुळीक यांचे बंधू योगेश यांची नावे आघाडीवर आहेत. असे असले तरी अध्यक्षपदासाठी चार प्रमुखांमध्ये चुरस असणार आहे.


महापालिकेच्या तिजोरीची चावी मानल्या जाणार्‍या स्थायी समितीचे अध्यक्षपद हे अत्यंत महत्त्वाचे आणि प्रतिष्ठेचे मानले जाते. सत्ताधारी भाजपकडेच हे अध्यक्षपद आहे. त्यामुळे स्थायी समिती सदस्यपदी भाजपकडून कोणाला संधी मिळणार, यावर अध्यक्षपदाची गणिते ठरणार होती. त्यानुसार मंगळवारी सदस्य निवडीनंतर अध्यक्षपदाची लढत कशी होणार, याचे चित्र स्पष्ट आहे. आमदार योगेश टिळेकर यांच्या मातोश्री रंजना यांची निवड झाल्याने त्याही अध्यक्षपदाच्या स्पर्धेत असल्याचे स्पष्ट झाले आहे; मात्र खरी चुरस ही कांबळे आणि मुळीक यांच्यातच आहे. 

कांबळे यांची ही पाचवी टर्म आहे. त्यामुळे ते प्रमुख दावेदार मानले जातात. मात्र, जातीय समीकरणे पाहता, प्रमुख पदांमध्ये मराठा समाजाकडे एकही पद आता राहिले नसल्याने मुळीक हे पुन्हा एकदा आयत्यावेळी बाजी मारू शकतात. मात्र, टिळेकर यांच्याकडे युवा मोर्चाचे अध्यक्षपद आहे, त्यामुळे एका घरात किती पदे देणार, असाही प्रश्‍न उपस्थित होऊ शकतो. त्यामुळे टिळेकर यांना बॅकफूटवर जावे लागण्याची शक्यता आहे. मंजुषा नागपुरे यांचे नावही आयत्यावेळी पुढे येण्याची शक्यता आहे. वाद टाळण्यासाठी आयत्यावेळी महिला चेहरा म्हणून त्यांची वर्णी लागू शकते.