Thu, Jul 02, 2020 23:38होमपेज › Pune › पुणे : एसआरपीएफच्या २० जवानांना कोरोनाची लागण

पुणे : एसआरपीएफच्या २० जवानांना कोरोनाची लागण

Last Updated: May 26 2020 9:30PM
पुणे : पुढारी वृत्तसेवा 

मुंबई घाटकोपर परिसरातून बंदोबस्त करून आलेल्या रामटेकडी येथील राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) ग्रुप दोनच्या कंपनीतील २० पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कोरोना सदृश त्रास होऊ लागल्यामुळे त्यांच्या चाचण्या केल्या असता, 20 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या संपर्कातील इतर पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. मात्र अद्याप ३३ पोलिसांचे अहवाल येणे बाकी आहे.

याबाबत ग्रुप दोनचे सहायक समादेशक लक्ष्मण उत्तेकर यांनी सांगितले की, मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे रामटेकडी येथील एसआरपीएफ दोनची एक कंपनी बंदोबस्तासाठी मुंबई येथे गेली होती. या कंपनीत साधारण ९० कर्मचारी आहेत. ही कंपनी घाटकोपर परिसरात बंदोबस्तासाठी तैनात होती. दरम्यान बंदोबस्त केल्यानंतर १९ मे रोजी ही कंपनी बंदोबस्त करून पुण्यात आली होती.

त्यानंतर २१ मे रोजी या कंपनीतील काही पोलिसांना कोरोनाची लक्षणे दिसू लागली. त्यामुळे या कंपनीतील २० जणांचे सुरूवातीला स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते.

त्यानंतर मंगळवारी आणखी १४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांवर बिबवेवाडी येथील राव नर्सिंग होम येथे उपचार सुरू आहेत. तसेच, त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. आणखी ३३ जणांचे अहवाल येणे बाकी आहे.  मागील काही दिवसापूर्वी मुंबई येथे  बंदोबस्तासाठी गेलेल्या आणखी एका  ग्रुप दोनच्या कंपनीतील जवानांना कोरोनाची लागण झाली होती.