Tue, Apr 23, 2019 21:50होमपेज › Pune › महावितरणच्या बारामती परिमंडलातील प्रकार 

पुणे : तब्बल बत्तीस दिवसानंतर सुरू झाला वीज पुरवठा 

Published On: Aug 02 2018 6:05PM | Last Updated: Aug 02 2018 6:05PMपुणे : प्रतिनिधी 

परिमंडलाच्या हद्दीतील कोणतेही रोहित्र नादुरूस्त झाल्यास ते रोहित्र  शहरी भागात असेल तर चोवीस तास आणि ग्रामीण भागात असल्यास अठ्ठेचाळीस तासात दुरूस्त अथवा बदलण्याची तरतूद आहे. मात्र महावितरण वीज कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उदासिनेतेमुळे  नादुरूस्त झालेले रोहित्र तब्बल बत्तीस दिवसांनंतर बदलण्याची किमया साधली. हा प्रकार बारामती परिमंडलाच्या हद्दीतील एका खेडेगावत घडली असून, एका ज्येष्ठ नागरिक वीजग्राहकाने केलेल्या पाठपुराव्यास उशीरा का होईना पण यश मिळविले. 

बारामती परिमंडलातील मळोली (ता.माळशिरस) या गावातील तुपेवस्ती येथे असलेले रोहित्र जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात अचानक  जळाले. त्यामुळे या वस्तीचा वीजपुरवठा खंडित झाला. याबाबत यावस्तीवरील नागरिकांनी या भागाचे वीजेचे काम पाहणारे वायरमन यांच्याकडे तक्रार केली. मात्र त्याची दखल घेतलीच नाही. परिणामी वस्तीवरील नागरिकांना अंधारात दिवस काढावे लागले. वस्तीवर राहणारे अनेक जण ज्येष्ठ  नागरिक आहेत. त्यामुळे रोहित्र दुरूस्त होईल या आशेवर बसले होते. मात्र त्यानंतरही हे रोहित्र दुरूस्त झाले नाहीच. 

वस्तीवरील  ज्येष्ठ नागरिक  विजयसिंह जाधव यांनी जवळच असलेल्या महावितरणच्या  अकलूज विभागातील वेळापूर सबस्टेशन येथील अधिकार्‍यांकडे रोहित्र दुरूस्त करण्याबाबत अर्ज दिला. मात्र तेथील अधिकारी तसेच  कर्मचर्‍यांनी अर्जास केराची टोपली दाखविली .परिणामी रोहित्र दुरूस्त झालेच नाही. 

कोणतीही हार न मानता त्यांनी अकलूज विभाग त्यानंतर बारामती परिमंडलातील अधिकार्‍यांपर्यत धडक मारून अर्ज केले. जाधव यांनी सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब निकम यांच्याशी संपर्क साधून गेल्या अनेक दिवसांपासून रोहित्र बंद  असल्याबाबत माहिती दिली.निकम यांनी प्रादेशिक कार्यालयातील प्रादेशिक संचालक यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला तसेच मेसेज सुध्दा पाठवला,मात्र त्याची दखल घेतली नाही वारंवार पाठपुरावा केल्यानंतर तब्बल ३२ दिवसानंतर परिमंडलातील अधिका-यांनी भेट देवून प्रत्यक्षात रोहित्राची पाहणी केली आणि रोहित्र बदलले.