Sat, Mar 23, 2019 18:06होमपेज › Pune › नक्षलवाद्यांकडून राजीव गांधीं यांच्याप्रमाणेच PM मोदींच्या हत्येचा कट? : सरकारी वकील 

नक्षलवाद्यांकडून राजीव गांधीं यांच्याप्रमाणेच PM मोदींच्या हत्येचा कट? : सरकारी वकील 

Published On: Jun 08 2018 12:52PM | Last Updated: Jun 08 2018 1:22PMमुंबई : विशेष प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नक्षलवाद्यांचे टार्गेट असल्याचे स्पष्ट झाले आहे. राजीव गांधी यांच्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांना एलिमिनेट केले पाहिजे, अशी सूचना एका फ्रंटल नेत्याने आपल्या केडरला दिल्याचे पुरावे समोर आले आहेत. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही धमकीचे पत्र आले आहे. गडचिरोलीत नक्षलवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईचा बदला घेण्याची धमकी या पत्रामध्ये देण्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आली असून, मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणात वाढ करण्यात आली आहे.

अर्बन नक्षल फ्रंटलवर झालेल्या छापेमारीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संपविण्याचा नक्षलवादी कट रचत असल्याचे समोर आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नक्षलवाद्यांच्या आपसातील संवाद सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागला आहे. त्यामध्ये राजीव गांधी यांच्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांनाही एलिमिनेट केले पाहिजे, अशी सूचना एक फ्रंटल नेता आपल्या नक्षल केडरला देत आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांची अर्बन फ्रंटल मोदींच्या हत्येचे कारस्थान रचत आहे. अर्बन फ्रंटलच्या छाप्यात अनेक महत्त्वाच्या गोष्टी सापडल्या असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

एल्गार परिषदेच्या आयोजनाप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामधील रोना विल्सनच्या घरी झालेल्या छापेमारीत या खळबळजनक संवादाचे पुरावे सापडले आहेत. रोना विल्सनला दिल्लीतून अटक करण्यात आली होती. या पत्रात राजीव गांधी यांची ज्याप्रमाणे हत्या घडवून आणण्यात आली, त्याप्रमाणे हत्या घडवून आणण्याच्या तयारीत माओवादी आहेत, अशी माहिती सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी पुणे न्यायालयात दिली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही धमकी देणारी दोन पत्रे मंत्रालयात आली आहेत. मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांना मारण्याची धमकी या पत्रातून देण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात एप्रिलमध्ये पोलिसांच्या कारवाईत मोठ्या संख्येने माओवादी मारले गेले होते. त्यानंतर आलेल्या धमक्यांच्या दोन पत्रांमध्ये मुख्यमंत्री फडणवीस, त्यांचे कुटुंबीय आणि गडचिरोलीतील कारवाई करणार्‍या पोलिस अधिकार्‍यांना लक्ष्य केले जाईल, आम्ही या कारवार्ईचा बदला घेऊ, अशा धमक्या देण्यात आल्या आहेत. या पत्रांमुळे खळबळ उडाली आहे.

आम्ही मार्क्सच्या विचारांनी प्रेरित लोक आहोत. आमच्यातील काही जणांना ठार करून तुम्ही आमचा विचार संपवू शकणार नाही. गडचिरोलीत जे काही घडले, त्याचा हिशेब नक्‍कीच होईल, अशी भाषा या पत्रांमध्ये वापरण्यात आली आहे.  ही पत्रे नेमकी कुठून आली, याचा कसून तपास गृह विभाग घेत आहे. आपल्याला आलेले पत्र आपण पोलिसांना दिले असून, त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

कोरेगाव - भीमा येथील हिंसाचाराच्या घटनेप्रकरणी माओवादी समर्थकांवर बुधवारी अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर माओवाद्यांच्या हिंसक कारवाया वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांना सतर्कता बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि कुटुंबीयांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.