Thu, Jun 27, 2019 10:33होमपेज › Pune › पुण्यातील ५ जणांना पोलिस पदक

पुण्यातील ५ जणांना पोलिस पदक

Published On: Jan 26 2018 1:22AM | Last Updated: Jan 26 2018 1:14AMपुणे : प्रतिनिधी 

पुणे शहर पोलिस दलातील पाच पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना  गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलिस पदक  जाहीर करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला आणि सहआयुक्त रवींद्र कदम यांनी या सर्वांचे अभिनंदन केले आहे. 

पुणे शहर आयुक्तालयातील बिनतारी संदेश विभागातील पोलिस निरीक्षक भीम छापछडे, राज्य महामार्ग विभागातील पोलिस निरीक्षक सुधीर अस्पत, बिनतारी संदेश विभागातील सहायक फौजदार विक्रम काळे, पुणे मुख्यालयातील सहायक फौजदार जयसिंगराव संकपाळ यादव, वाहतूक शाखेतील सहायक फौजदार सोमनाथ पवार यांना राष्ट्रपतींचे पोलिस पदक जाहीर झाले आहे. 

कारागृह विभागातील सात जणांना पदक

महाराष्ट्र कारागृह विभागातील सात अधिकारी व कर्मचार्‍यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती सुधारसेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. महानिरीक्षक (तुरुंग) डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनीही अभिनंदन केले आहे. 

राज्य कारागृह विभागातील उपअधीक्षक सुनील ढमाळ, नागपूर कारागृह ः सुभेदार धर्मराज नघाटे, येरवडा कारागृह ः सुभेदार आनंदा हिरवे, जालना जिल्हा कारागृह ः हवालदार जगन्नाथ खुपसे, कोल्हापूर कारागृह ः हवालदार संजीव घाणेकर, अमरावती कारागृह ः हवालदार गजानन क्षीरसागर, औरंगाबाद कारागृह ः रक्षक सुभाष तायडे यांना राष्ट्रपती सुधारसेवा पदक जाहीर करण्यात आले. 

रिपु सदन कुमार मानकरी

वरिष्ठ इंटेलिजन्स (गुप्तचर) अधिकारी रिपु सदन कुमार यांना या वर्षीचे राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात येणार आहे. केंद्रीय वित्त मंत्रालय, राजस्व विभागाच्या अखत्यारीत असलेल्या वस्तू व सेवाकर अधिसूचना महानिदेशालय (डायरेक्टोरेट जनरल ऑफ जीएसटी इंटेलिजन्स) विभागीय कार्यालय पुणे येथे ते कार्यरत आहेत.