Thu, Aug 22, 2019 11:13होमपेज › Pune › पुणे, पिंपरीमध्ये भाजप, राष्ट्रवादीचाच बोलबाला!

पुणे, पिंपरीमध्ये भाजप, राष्ट्रवादीचाच बोलबाला!

Published On: May 07 2018 2:03AM | Last Updated: May 07 2018 1:39AMपुणे : प्रतिनिधी

गेल्या लोकसभा निवडणुकीपासून सातत्याने भाजपला साथ देणार्‍या पुणे महानगराच्या जनमानसात चार वर्षांनंतर काही बदल झाला काय, या प्रश्‍नाचे उत्तर शोधताना ‘खूप काही बदल झालेला नाही’, असा निष्कर्ष निघतो. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या जुळ्या महानगरांचा कल भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे झुकलेला दिसतो. दुसरी पसंती आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसला.

महाराष्ट्राचे ‘राजकीय मानस’ काये आहे याचा शोध ‘पुढारी’ने विदर्भ वगळता अन्य सर्व जिल्ह्यांमध्ये महासर्वेक्षणाच्या माध्यमातून घेतला. त्याचे वाचकांनी व्यापक स्वागत केले. एकंदरीत महाराष्ट्राचा कल जाणून घेतानाच राज्याचे विविध भाग आणि महानगरे-शहरांमध्येही स्थानिक पातळीवर राजकीय कल काय आहे, याचाही धांडोळा घेतला. पुणे आणि पिंपरी-चिंचवड (पुणे मेट्रो रिजन) या महानगरांतील नागरिक भाजपला सर्वाधिक अनुकूल असल्याचे दिसले. राज्य सरकारची कामगिरी चांगली असल्याचे 44 टक्के लोक मानतात, तर 51 टक्के नागरिकांनी सरकारला पाचपेक्षा अधिक गुण (दहापैकी) दिले आहेत. मात्र त्याचवेळी अवघ्या 16 टक्के लोकांना सरकार ‘मेरिट’मध्ये पास झाल्याचे वाटते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे काय?

मागच्या सलग दोन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडी, तर पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीकडे महापालिकांची सत्ता सोपवणार्‍या मतदारांनी लोकसभेत युतीला, तर विधानसभेवेळी भाजपला पूर्ण कौल दिला. तसेच नंतरच्या महापालिका निवडणुकांमध्ये दोन्ही महानगरांमध्ये भाजपला पूर्ण बहुमत दिले. विधानसभा निवडणुकीला सुमारे चार वर्षे आणि महापालिका निवडणुकांना एक वर्ष झाल्यानंतर सत्ताधार्‍यांविरोधात जनमानस तयार होत आहे, असा दावा केला जात आहे. 

या पार्श्‍वभूमीवर दोन्ही शहरांमध्ये राष्ट्रवादीच्या स्थितीत काही सुधारणा झाली काय, हे पाहणे सर्वांसाठी औत्सुक्याचे होते. महासर्वेक्षणावेळी विचारलेल्या ‘आता निवडणूक झाली तर कोणत्या पक्षाला मत द्याल’ या प्रश्‍नाला प्रतिसाद देताना 38 टक्के नागरिकांनी भाजपला पसंती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने 26 टक्के लोक असल्याचे दिसले. त्याखालोखाल काँग्रेस 14 टक्के, शिवसेना 8 टक्के, तर अन्य पक्षांकडे 14 टक्के नागरिकांचा कल दिसतो.

कोणता मुद्दा चालणार?

‘शेतकर्‍यांच्या आत्महत्या’ हाच सार्वत्रिक निवडणुकीवर प्रभाव टाकणारा सर्वात मोठा मुद्दा ठरेल, असे नागरिकांना वाटते. त्यांना सहा पर्याय देण्यात आले होते. शेतकरी आत्महत्यांच्या मुद्द्याला 58 टक्के नागरिकांनी महत्त्वाचा मुद्दा मानले, तर त्यानंतर बँकांतील घोटाळे, नोटाबंदी, जीएसटी, मराठा मोर्चा, कोरेगाव भीमा प्रकरण असा क्रम नागरिकांनी लावला आहे. घोटाळे, जीएसटी आणि नोटाबंदीला तुलनेने या दोन महानगरांनी अधिक प्राधान्य दिल्याचे दिसते. 

अनेक प्रश्‍नांवर उर्वरित महाराष्ट्रापेक्षा वेगळा कौल देणार्‍या पुणे-पिंपरीकरांचे ‘जलयुक्त शिवार’ वर मात्र एकमत दिसते. त्यांनाही ही योजना सर्वात चांगली (67 टक्के) वाटते. त्यानंतर शेतकर्‍यांची कर्जमाफी, स्टार्टअप धोरण, कौशल्य विकास आणि सेवाहमीला त्यांनी महत्त्व दिले आहे.

मुख्यमंत्री म्हणून कोणाचे वलय अधिक? 

आगामी निवडणुकीनंतर कोण मुख्यमंत्री व्हावे असे आपणास वाटते, या प्रश्‍नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला तब्बल 39 टक्के नागरिकांनी त्यांचा मनातला मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली. फडणवीस यांनी या दोन्ही महानगरांमध्ये सुरुवातीपासूनच अधिक लक्ष घातले आहे.26 टक्के पसंतीसह राष्ट्रवादीचे नेते अजित पवार दुसर्‍या क्रमांकावर आहेत. म्हणजे पुण्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्येच पहिल्या आणि दुसर्‍या स्थानासाठी चुरस दिसते. तिसरी पसंती पृथ्वीराज चव्हाण (14 टक्के), चौथी पसंती उद्धव ठाकरे (6 टक्के) यांना दिसते. राज ठाकरे आणि अशोक चव्हाण यांच्याकडे सारखाच (4 टक्के) कल आहे. त्यानंतर धनंजय मुंडे (3 टक्के), सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे (प्रत्येकी 2 टक्के) यांचा क्रम लागतो.