Fri, Mar 22, 2019 22:52होमपेज › Pune › ‘व्हायरल’ने पुणेकर फणफणले

‘व्हायरल’ने पुणेकर फणफणले

Published On: Feb 16 2018 1:50AM | Last Updated: Feb 16 2018 1:38AMपुणे : प्रतिनिधी

या महिन्यात तापमानामध्ये होत असलेल्या चढ-उतारामुळे पुणेकरांचे आरोग्य चांगलेच धोक्यात आले आहे. तापमान आणि वातावरणातील बदलामुळे लहान-थोरांना ताप, थंडी, खोकला, सर्दी या लक्षणांनी बेजार केले असून, नेहमीपेक्षा 20 ते 30 टक्के रुग्णांची गर्दी दवाखान्यांत वाढली आहे. उपचार करूनही तीन दिवस आजारपण जात नसल्याचे डॉक्टरांचे निरीक्षण आहे. 

सध्या हवामानातील वातावरण हे दिवसा आणि रात्री परस्परविरोधी आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून दिवसाचे तापमान हे 13 ते 17 अंश सेल्सिअस; तर रात्र्रीचे तापमान हे 12 अंश सेल्सिअसच्या खाली येत आहे. या तापमानातील तीव्र बदल वातावरणातील विषाणूंच्या वाढीसाठी पोषक ठरते; यामुळे विषाणूंची वाढ वेगाने होत आहे. म्हणून सध्या प्रत्येक घरातील कोणी ना कोणी आजारी पडल्याचे दिसून येत आहे. साधारणतः फेब्रुवारी महिन्यात उन्हाळा जाणवू लागतो; पण याच कालावधीत ठिकठिकाणी गारपीट झाली आहे. त्यामुळे वातावरणात हे तीव्र बदल जाणवत आहेत.

शहरातील जनरल प्रॅक्टिशनर्सच्या निरीक्षणानुसार त्यांच्या दवाखान्यांमध्ये नेहमीपेक्षा 20 ते 30 टक्के रुग्णांची वाढ झालेली आहे. यापैकी जास्त रुग्ण हे ताप, खोकला, सर्दी, डेंग्यू, न्यूमोनिया, गॅस्ट्रोचे आहेत. ही साथ संसर्गजन्य असून, कुटुंबातील एक  सदस्य जरी आजारी पडला तरी त्याची लागण इतरांनादेखील होत आहे.

अशी घ्या काळजी

पाणी उकळून प्या, वैयक्‍तिक स्वच्छता बाळगा.

आहारात बीट, गाजर, सफरचंद, पालेभाज्या, अंडी यांचा समावेश करा. प्रतिकारशक्‍ती वाढेल.

बाहेरचे पदार्थ, बर्फ असलेले पेय टाळा.

मूल आजारी असल्यास शाळेत पाठवू नका, त्यापासून इतरांना संसर्ग होण्याचा धोका.

बाहेर पडताना नाकाला रुमाल बांधा.