Thu, Jun 27, 2019 17:45होमपेज › Pune › पुणे : दहा हजार अनधिकृत बांधकामांना नोटिसा 

पुणे : दहा हजार अनधिकृत बांधकामांना नोटिसा 

Published On: Apr 29 2018 2:41AM | Last Updated: Apr 29 2018 2:30AMपुणे ः प्रतिनिधी 

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) कार्यक्षेत्रातील दहा हजार अनधिकृत बांधकामांना नोटिसा जारी केल्या आहे. अनधिकृत बांधकामे शोधून त्यांना नोटीस देणे, बांधकाम पाडण्याची कारवाई करण्याचे काम ठेकेदाराला देण्यात आले आहे, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली आहे. 

पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रातील वाघोली, लोणी काळभोर, नर्‍हे, ओव्हाळवाडी, तळे रानवाडी, कुंजीरवाडी, कदम वस्ती, मांजरी खुर्द, मांजरी बुद्रुक, कोंढवे धा., गुजरवाडी, निंबाळकरवाडी, वडकी, डोंजे, नांदेड, उरुळी कांचन, खेड शिवापूर, किरकटवाडी, केसनंद, लोणीकंद आदीसह इतर गांवामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे आहेत. या सर्व गावांमध्ये 16 हजार 935 अनधिकृत बांधकामे आहेत. काही गावांचा समावेश नुकताच पालिकेच्या हद्दीत झाल्याने 4 हजार 997 अनधिकृत बांधकामे पालिका हद्दीत गेली आहेत. 

या अनधिकृत बांधकामांवर पालिका कारवाई करेल, मात्र उर्वरित बांधकामांवर व इमारतींवर पीएमआरडीएकडून कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. यापुढेही ही मोहीम सुरूच राहणार आहे. यासाठी 10 हजार अनधिकृत बांधकामांना आणि इमारतींना नोटीसा पाठविल्या आहेत. अनधिकृत बांधकामे शोधून त्यांना नोटीस देणे, बांधकाम पाडण्याची कारवाई करण्याचे काम ठेकेदाराला देण्यात आले आहे. 

अनधिकृत बांधकामे केलेल्या 95 प्रकरणांमध्ये 4 लाख 94 हजार 583 चौरस फुटाच्या क्षेत्रात कारवाई करण्यात आली आहे. प्रतिबंधकात्मक कारवाई 92 अनधिकृत बांधकामांवर केली आहे. कारवाईसाठी सेवानिवृत्त पोलिसांचे अणि अधिकार्‍यांचे स्वतंत्र पोलिस पथक पीएमआरडीएकडून नेमण्यात आल्याचे बापट यांनी सांगितले.    तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू

पीएमआरडीएच्या परिसरात पाणी पुरवठा योजनांसाठी 3 कोटी रुपये प्रस्तावित केले आहेत. त्या अंतर्गत 25 ते 30 गावांमधील तलावातील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. दिवे घाट परिसरातील मस्तानी तलाव, वडाची वाडी येथील तलावातील गाळ काढण्याच्या कामास प्रारंभ केल्याचे बापट यांनी सांगितले.