Mon, Mar 25, 2019 03:21
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › पुणे-नाशिक रेल्वेमार्ग स्वतंत्र 

पुणे-नाशिक रेल्वेमार्ग स्वतंत्र 

Published On: Jul 20 2018 1:12AM | Last Updated: Jul 20 2018 12:41AMमंचर : प्रतिनिधी

पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या भागीदारीतून महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्‍चर डेव्हलपमेट लिमिटेड कंपनी  (एमआरआयडीएल) स्थापन करण्यात आली असून, आता या कंपनीद्धारे हा मार्ग उभारला जाणार आहे.

या कंपनीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 13 नवीन रेल्वे प्रकल्पांचे काम करण्यात येणार आहे. त्यापैकी पहिल्या तीन प्राधान्याने घेण्यात येणार्‍या प्रकल्पांमध्ये पुणे-नाशिक रेल्वेचा समावेश आहे. कंपनीमध्ये प्राथमिक गुंतवणूक म्हणून राज्य आणि केंद्र शासनाने प्रत्येकी 40 कोटी निधी दिला आहे. केंद्र सरकारचा निधी लवकरच वर्ग करून या रेल्वेमार्गाच्या पीईसीटी (प्रिलीमनरी इंजिनिअरिंग कम ट्राफिक) सर्व्हेचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे या प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल यांनी सांगितल्याची माहिती खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.

पुणे-नाशिक रेल्वेचा प्रकल्प सविस्तर अहवाल (डिपीआर) निती आयोगाकडे मान्यतेसाठी गेला आहे.डिसेंबर-जानेवारी पर्यत हा प्रकल्प मंजूर होईल, अशी अपेक्षा असल्याचे जयस्वाल यांनी या बैठकीत सांगितले. या सर्व्हेचा सुधारित अहवाल 12 मार्च 2010 ला रेल्वे बोर्डाला सादर झाला. त्या अहवालानुसार प्रकल्पाची सुधारित किंमत रू. 1899.64 कोटी तर परतावा वजा 2.84 टक्के इतका होता. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने दि. 29 जून 2010 रोजी हा प्रकल्प होणार नाही असे जाहीर करून फाईल बंद केली होती. 

तोट्यात चालणार्‍या या रेल्वे मार्गाच्या उभारणीसाठी महाराष्ट्र  सरकारने अर्धा खर्च उचलण्याची तयारी दर्शविल्यानंतर  रेल्वे मंत्रालय 50 टक्के भागीदारीवर सर्व्हे करायला तयार झाले. त्यानुसार तिसरा सर्व्हे अहवाल 24 फेब्रुवारी 2012 रोजी रेल्वे बोर्डाला सादर करण्यात आला. यामध्ये परतावा 4.11 टक्के आला. प्रकल्पाचा सुधारित अहवाल सकारात्मक आल्यानंतर 7 जून 2012 रोजी राज्य सरकारने 50 टक्के खर्चाचा वाटा उचलण्याची तयारी दर्शविल्याचे लेखी संमती पत्र रेल्वे मंत्रालयाला सादर केले. त्यानंतर 2012 च्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये तत्कालीन रेल्वे मंत्र्यानी या रेल्वे मार्गाला तत्त्वतः मंजूरी दिली. रेल्वे अर्थसंकल्पानंतर या प्रकल्पाचा अहवाल मंजुरी आणि स्क्रुटिनीसाठी केंद्राच्या नियोजन समितीकडे सादर करण्यात आला. मात्र दुर्देवाने अर्थसंकल्पात प्रकल्पासाठी तरतूद केली गेली नसल्याचे खा. आढळराव यांनी नमूद केले. 

पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प गुंडाळण्याच्या उलटसुलट बातम्यांचा पार्श्‍वभूमीवर रेल्वेचे अतिरिक्‍त महाप्रबंधक विशाल अग्रवाल,  एमआरआयडीएचे कार्यकारी संचालक राजेश कुमार जयस्वाल, रेल्वेचे इंजिनियर (कंस्ट्रक्शन) राजीव मिश्रा यांच्यासमवेत मुंबईत मंगळवारी(दि.17) बैठक झाली. कार्यकारी संचालक जयस्वाल म्हणाले, येत्या दोन आठवड्यात सल्‍लागार कंपनीसाठी निविदा काढण्यात येणार असून त्यानंतर 3 महिन्यात पीईसीटी सर्व्हे करण्यात येणार आहे.