Wed, Mar 20, 2019 22:56होमपेज › Pune › पुणे-नाशिक लोहमार्गाला विलंब

पुणे-नाशिक लोहमार्गाला विलंब

Published On: Jan 18 2018 1:46AM | Last Updated: Jan 18 2018 12:19AM

बुकमार्क करा
पुणे : निमिष गोखले 

बहुप्रतीक्षित व बहुचर्चित पुणे-नाशिक लोहमार्गाला आणखी विलंब होणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. दोन दशकांहून अधिक काळ या नव्या मार्गाची सर्व पातळ्यांवर केवळ चर्चाच सुरू असून, रेल्वेचा उदासीन कारभार, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, या कारणांमुळे पुणेकरांचे नाशिकला जलद पोहोचण्याचे स्वप्न अद्यापही पूर्ण होऊ शकलेले नाही. सध्या पुण्याहून कर्जत, पनवेल, कल्याणमार्गे नाशिकला रेल्वे जाते. मात्र, या प्रवासाला तब्बल सहा ते सात तासांचा कालावधी लागतो; तसेच रस्ते वाहतूक देखील बेभरवशाची असल्याने पुणे-नाशिकदरम्यान नवा लोहमार्ग असावा, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासूनची आहे. 

डीपीआर अर्थात तपशीलवार प्रकल्प अहवाल ऑगस्टमध्ये पुणे विभागाकडून रेल्वे बोर्डाला पाठविण्यात आला होता. तो मंजूरही करण्यात आला. मात्र, प्रकल्प खर्च दुपटीवर गेला असून, रेल्वे बोर्डाकडून दुप्पट रक्कम देण्यास नकार देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकल्पाचा प्रस्तावित खर्च सुमारे 2500 कोटी रुपये एवढा होता. परंतु, प्रत्यक्षात मात्र 5000 कोटी रुपयांवर प्रकल्प खर्च गेल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.  जमिनीचा खर्च अधिक असून, तो गगनाला भिडला असल्याचे कारण रेल्वे बोर्डाकडून पुढे केले जात असून, घाटाचा अवघड टप्पा, डोंगराळ प्रदेशामुळे प्रकल्पाची रक्कम दुपटीहून अधिक झाल्याची माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील एका अधिकार्‍याने दिली आहे. नव्या नियमाप्रमाणे ज्यांच्याकडून जमीन हस्तांतरित केली जाते, अशांना रेल्वेने जमिनीच्या रकमेव्यतिरिक्त पाच टक्के अधिक देणे बंधनकारक आहे. या नियमाचाही रेल्वेला फटका बसत असून यामुळे पुणे-नाशिक लोहमार्गाची गाडी यार्डातच अडकल्याचे सद्यःस्थितीवरून दिसत आहे. 

व्हाया तळेगाव...

पुणे ते नाशिक नव्या लोहमार्गाची सुरुवात तळेगावहून होणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. बादलवाडी, चाकण, राजगुरुनगर, कळंब ही काही स्थानके या मार्गावर असून, तळेगाव येथे रेल्वेचे मोठे जंक्शन होणार असल्याची माहिती देण्यात आली. हा मार्ग 240 किलोमीटर लांबीचा असून, भविष्यात पुणे ते नाशिक प्रवास केवळ साडेचार ते पाच तासात पार करता येणे सहज शक्य होणार आहे. दरम्यान, वाढत्या नागरीकरणामुळे व ट्रॅक वाढविण्यास स्थानिकांचा असणारा विरोध या गोष्टींमुळे पुणे स्थानकावरून नाशिकसाठी रेल्वे सुटणे शक्य नव्हते, असे सांगण्यात आले.