Mon, Jun 17, 2019 19:22होमपेज › Pune › पुणे-नाशिक सहापदरीकरणाचा मार्ग मोकळा

पुणे-नाशिक सहापदरीकरणाचा मार्ग मोकळा

Published On: Dec 05 2017 1:45AM | Last Updated: Dec 05 2017 12:55AM

बुकमार्क करा

राजगुरुनगर/चाकण : प्रतिनिधी

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नाशिक फाटा ते चांडोली (खेड) या 29.93 कि.मी. लांबीच्या 1013.78 कोटी रकमेच्या कामास मान्यता मिळाली आहे. या कामाची निविदा प्रक्रिया येत्या दीड महिन्यात भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच या महत्त्वाकांक्षी कामाला प्रत्यक्ष सुरूवात होणार असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. 

यासंदर्भात खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले की, नाशिक फाटा ते चांडोली या रस्त्याचे सहापदरीकरण व्हावे यासाठी गेल्या चार वर्षांपासून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय व राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे पाठपुरावा सुरू होता. या पाठपुराव्यानंतर 14 जानेवारी 2016 रोजी या रस्त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल मंजूर करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्ते व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी पत्राद्वारे कळविली.

या रस्त्याचा काही भाग पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ताब्यात असल्याने हा रस्ता भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे वर्ग होणे आवश्यक होते. ही बाब लक्षात घेऊन या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून  महानगरपालिका आयुक्तांकडे पत्रव्यवहार करून व सातत्याने बैठका घेऊन महानगरपालिका हद्दीतील रस्त्याचे महानगरपालिकेने संपादन करावे व हा रस्ता राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करावा, अशी आग्रही मागणी लावून धरली होती.

त्यास आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेत पालिका हद्दीतील सदर रस्ता वर्ग करण्याकामी आवश्यक ती कार्यवाही केली. तत्पूर्वी या प्रकल्पासाठी 15 डिसेंबर 2011 रोजी भारत सरकारने राजपत्राद्वारे 13 गावांतील 63.358 हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन करण्याचे आदेश जारी केले होते. यामध्ये खेड तालुक्यातील कुरुळी, चिंबळी, नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, चाकण, वाकी खुर्द, वाकी बुद्रुक, शिरोली व चांडोली आदी गावांतील 52.144 हेक्टर, भोसरीमधील 5.563 हेक्टर, मोशीमधील 4.403 हेक्टर तर हवेली तालुक्यातील भोरडेवाडी येथील 1.248 हेक्टर क्षेत्राचे संपादन निश्‍चित करण्यात आले.

महत्त्वपूर्ण प्रश्‍न लागणार मार्गी  

गेल्या चार वर्षांपासून खासदार आढळराव पाटील यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. केंद्रीय मंत्र्यांसह केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालय, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अधिकार्‍यांकडे करीत असलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे. 
या महामार्गावरील वाढलेली प्रचंड वाहनसंख्या, भविष्यातील वाहतुकीची होणारी कोंडी या सर्व बाबींचा अभ्यास करून रस्त्याचा प्रकल्प अहवाल करण्यात आला आहे.

असा होणार महामार्ग 

नाशिक फाटा ते चांडोली (खेड) हा 29.93 किलोमीटर लांबीचा रस्ता सहापदरीकरणासह संपूर्ण रस्त्याच्या दोन्ही बाजूने सर्व्हिस रोड करण्यात येणार आहे.  रस्त्यावरील वाहतूककोंडी लक्षात घेऊन चाकण येथे 2.25 किलोमीटर, मोशी येथे 2.55 किलोमीटर तर चिंबळी येथे 700 मीटर लांबीचे सहापदरीकरण असलेले उड्डाणपूल उभारण्यात येईल. याशिवाय भोसरीतील लांडेवाडीजवळ उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. भोसरी एमआयडीसी, इंद्रायणीनगर, कुरूळी, आळंदी फाटा या ठिकाणी भुयारी मार्ग करण्यात येणार असून, स्पाईन रोड, वाकी खुर्द येथे ओव्हरपास करण्यात येणार आहे. तसेच इंद्रायणी व भामा नदी अशा दोन ठिकाणी मोठे पूल बांधण्यात येणार आहेत. वाहनांसाठी भुयारी मार्ग करण्यात येणाच्या ठिकाणी स्थानिक वाहतूक भुयारीमार्गाने तर लांब पल्यांच्या वाहनांसाठी त्यावरील सहापदरी महामार्गाने वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे.