Mon, Apr 22, 2019 16:42होमपेज › Pune › सहापदरीकरणाचे श्रेय आमदारांनी घेणे चुकीचे

सहापदरीकरणाचे श्रेय आमदारांनी घेणे चुकीचे

Published On: Dec 15 2017 2:46AM | Last Updated: Dec 15 2017 12:47AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नाशिकफाटा ते चांडोली (खेड) रस्त्याचे  सहापदरीकरण करण्याचा विषय आपण  मे 2013 मध्ये काँग्रेस-युपीए सरकारमधील तत्कालीन केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री डॉ. सी. पी. जोशी यांच्याकडे पाठपुरावा करून मार्गी लावला. त्यानुसार सर्व्हे झाला. 2014 मध्ये सत्ताबदल झाला तेव्हा नितीन गडकरी यांच्याकडेही या कामाचा पाठपुरावा केला. 14 जानेवारी 2016 रोजी त्यांनी व्यक्तिशः मला पत्र पाठवून मंजुरीबाबत कळविले. त्यामुळे भोसरीच्या आमदारांनी या कामाचे श्रेय घेऊ नये, असा टोला खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत मारला. 

भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी, ‘या रस्त्याच्या सहापदरीकरणासाठी गेल्या चार वर्षांपासून मी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करत होतो.  त्यानंतर 14 जानेवारी 2016  रोजी सविस्तर प्रकल्प अहवाल मंजूर करण्यात आला आहे. या कामाची निविदा प्रक्रिया येत्या दीड महिन्यात पूर्ण करण्यात येणार असून, लवकरच या महत्त्वाकांक्षी कामाला सुरुवात होणार आहे,’ असे नुकतेच प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविले. त्याचे वृत्त प्रसिद्ध होताच शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आ.  लांडगे  यांच्यावर त्यांचे नाव न घेता टीका केली. या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामशेठ गावडे, महिला शहर संघटिका सुलभा उबाळे आदी उपस्थित होते.  

राष्ट्रीय महामार्गाशी निगडित कामांचा विषय हा खासदारांचा आहे. आमदारांचा या विषयात प्रत्यक्ष अधिकार नसतो. त्यातच संबंधित आमदार त्या वेळी नगरसेवक होते. गडकरी हेही त्या वेळी मंत्री नव्हते. त्यामुळे त्या वेळी आमदारांनी चार वर्षांपूर्वी पाठपुरावा करण्याचा प्रश्नच येत नाही. माझ्याच बातम्या ‘कट पेस्ट’ करून कामाचे श्रेय घेणे बालिशपणाचे आहे, अशी टीका खा. आढळराव पाटील यांनी केली.