Tue, Mar 19, 2019 05:12



होमपेज › Pune › पुणे पालिका उभारणार स्वत:चे ‘ऑप्टिकल फायबर’ जाळे

पुणे पालिका उभारणार स्वत:चे ‘ऑप्टिकल फायबर’ जाळे

Published On: Feb 03 2018 2:16AM | Last Updated: Feb 03 2018 1:29AM



पुणे : प्रतिनिधी

महापालिका शहरात स्वत:चे  ऑप्टिकल फायबर केबलझाळे उभारणार आहे. त्यानुसार पुढील पाच वर्षात शहरात तब्बल 2 हजार 300 किमीच्या ऑप्टिकल केबल टाकण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेला उत्पन्नाचा नवा पर्याय मिळणार असून त्याचबरोबर सातत्याने रस्ते खोदाईच्या उद्योगांना आळा बसणार आहे. यासंबधीचे धोरणाचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला आहे.

गेल्या काही वर्षात डिजीटल क्रांती वेगाने होत आहे. त्यासाठी डिजीटल पायाभूत सुविधांची मागणी वाढत आहे. ही गरज लक्षात घेऊन आणि पालिकेचा उत्पन्नाचा नवा पर्याय उपलब्ध करण्यासाठी महापालिकेने आता ऑप्टिकल फायबर केबलचे झाळे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रशासनाने धोरण निश्‍चित केले असून ते स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवले आहे. या धोरणानुसार शहरात जीआयएस या तंत्रावर आधारित जवळपास 2 हजार 300 किमी रस्त्याची लांबीसाठी इतरांसमवेत वापरता येईल अशा पध्दतीची सुविधा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी शहरात सुरू असलेल्या सर्व शासकिय व खासगी संस्थांची खोदाईचा समावेश असलेल्या सर्व प्रकल्पांत फायबर डक्ट टाकण्यासाठी खोदकामाचे धोरण तयार करणे आणि यासर्व कामांवर देखरेख करण्याकरिता महापालिकेत केबल ऑप्टिकल फायबर इन्फ्रास्ट्रक्चर विभागाची स्थापना करण्यात 
येणार आहे.

या योजनेतंर्गत 2 हजार 300 किमीचे केबल टाकण्यात येणार आहे, त्यामधील समान पाणी पुरवठा जलवाहिनीच्या कामात 1हजार 400 किमीची, महानगर गॅस लिमिटेडच्या कामातंर्गत 300 ते 350 किमीचे, पावसाळी गटार लाईनच्या कामात 150 किमी, स्मार्ट सिटीतंर्गत करण्यात येणार्‍या रस्ते पुनर्विकास योजनेतंर्गत 30 ते 40 किमी आणि टेलिकॉम व इतर कामातंर्गत जवळपास 500 ते 600 किमीचे केबल पुढील पाच वर्षात टाकण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. दरम्यान हे नेटवर्क उभे राहिल्यानंतर या केबल डक्ट मोबाईल कंपन्यांना भाड्याने उपलब्ध करून देता येणार आहे. त्यातून महापालिकेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळणे शक्य होणार आहे.