पुणे : प्रतिनिधी
महापालिकेकडून वर्षाला जवळपास वीस टीएमसी पाणी वापर होत असल्याचा आरोप पाटबंधारे विभागाने केला आहे. पाण्याचा असाच बेसुमार वापर कायम ठेवल्यास उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागेल, असे स्पष्ट करीत होणार्या पुढील परिणामांना महापालिका जबाबदार राहील असेही पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.
शहरासाठी पाटवंधारे विभागाने महापालिकेला साडेअकरा टिएमसी पाणीसाठा मंजूर केला आहे. त्यानुसार महापालिकेने दररोज 900 एमएलडी इतका पाणी साठा उचलणे अपेक्षित आहे. मात्र, गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या कालवा समितीच्या बैठकित महापालिकेला साडेतेराशे एमएलडी पाणी वापरण्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र, त्यानंतर जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात महापालिकेकडून साडेसोळाशे ‘एमएलडी’पेक्षा जास्त पाणी वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले असल्याचे पाटबंधारे विभागाने म्हटले आहे.
त्यानुसार जानेवारी महिन्यात 1. 75 तर फेब्रुवारी महिन्यात 1.51 टिएमसी इतके पाणी वापरले गेले. याबाबत महापालिका व पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांनी गेल्या तीन दिवसातील पाणी वापराच्या मीटरच्या रिडींगची तपासणी केली असता त्यात साडेसोळाशे ‘एमएलडी’पेक्षा अधिक पाणी उचलत असल्याचे आढळून आले, त्यामुळे महापालिकेकडून मंजुरीपेक्षा तीनशे एमएलडी अधिक पाणी वापर होत असल्याने वर्षाचा पाणी वापर वीस ‘टिएमसी’पेक्षा अधिक होत असल्याचे पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्याने महापालिकेला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा 15 जुलैपर्यंत शहराला आणि शेतीसाठी पुरवायचा आहे, त्यामुळे महापालिकेने बेसुमार पाणी वापरावर नियंत्रण आणावे, असेही या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
Tags :