Thu, Apr 25, 2019 07:58होमपेज › Pune › महापालिका भवनाला बेकायदा पार्कींगचा विळखा 

महापालिका भवनाला बेकायदा पार्कींगचा विळखा 

Published On: Jun 20 2018 2:36PM | Last Updated: Jun 20 2018 2:36PMपुणे : हिरा सरवदे 

महापालिकेच्या देखण्या विस्तारीत इमारतीमुळे शहराच्या वैभवात भर पडत असताना या इमारतीस आणि संपूर्ण पालिका भवनासच बेकायदा पार्कींगने विळखा घातला आहे. त्यामुळे या परिसरात वारंवार वाहतुक कोंडी होत आहे. माननियांच्या दहशतीमुळे या परिसरात कारवाई करण्यास वाहतुक पोलिस धजावत नाहीत. दरम्यान उपराष्ट्रपतींच्या दौर्‍यानंतर या परिसरात नो-पार्कींगमध्ये लावलेल्या वाहनांवर कारवाई केली जाणार असल्याचे शिवाजीनगर वाहतुक शाखेतर्फे सांगण्यात आले आहे. 

विविध कामे करण्यासाठी महापालिकेत येणार्‍या नागरिकांसाठी आणि माननियांच्या गाड्यांसाठी महापालिका परिसरात मोठ्या प्रमाणात वहान तळांची व्यवस्था करण्यात आली आहे. बाणेर-बालेवाडीसह इतर ठिकाणी जाण्यासाठी पालिका परिसरात पीएमपी बस स्थानकांची व्यवस्था करण्यात आल्याने या परिसरातून ये-जा करणार्‍या बसची संख्या मोठी आहे. या परिसरातील वाहतुकीला अडथळा होऊ नये, यासाठी पुणे पोलिसांच्या वाहतुक शाखेने महापालिका गेटच्या बाहेर समोरील आणि इमारतीच्या पश्‍चिमेकडूल रस्त्यांवर दोन्ही बाजूस बाहने पार्कींग करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. 

पालिकेचा वाढता विस्तार आणि वाढते नागरिकरण यामुळे महापालिकेत येणार्‍यांची संख्या वाढलेली आहेत. त्यात सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचा वापर न करता स्वतःची गाडी घेऊन येणार्‍याचे प्रमाण वाढल्याने पालिकेचे वहानतळ कमी पडत आहे. परिणामी पालिका परिसरात नो-पार्कींग असूनही संपूर्ण इमारतीस बेकायदा पार्कींगने विळखा पडल्याचे चित्र दररोज पहायला मिळते. 

महापालिका भवनासमोरील रस्त्यांवर दोन्ही बाजून आणि रस्त्याच्या मध्यभागी बेकायदेशीर रित्या आणि बेशिस्तपणे चारचाकी आणि दुचाकी गाड्या पार्कींग केल्या जातात. या ठिकाणी माननियांसह महापालिका प्रशासनाच्याही गाड्या अस्ताव्यस्त स्वरुपात पार्क केल्या जातात. इमारतीच्या पश्‍चिमेकडील रस्त्यावर दोन्ही बाजूस दुचाकी पार्कींग केल्या जातात. परिणामी या रस्त्यावरून जाणार्‍या पीएमपी बस आणि इतर वाहनांना वाहतुककोंडीचा सामना करावा लागतो. या परिसरात वाहतुक पोलिसांकडून लावण्यात आलेल्या नो-पार्कींगच्या पाट्या कार्यकर्त्यांनी काढून टाकल्याचे वाहतुक पोलिसांनी सांगितले. 

माननियांच्या दहशतीमुळे पोलिसांचे दुर्लक्ष
नगरसेवकांच्या किंवा कार्यकर्त्यांच्या गाड्यांवर कारवाई केल्यास त्यांच्याकडून धमकी देण्याचे प्रकार घडतात. सत्ताधारी नगरसेवकांकडून बदली करण्याची किंवा बघुन घेण्याची भाषा केली जाते. नगरसेवकाने वाहतुक पोलिसांना मदबाजी व शिवीगाळ केल्याच्या घटनाही यापूर्वी घडलेल्या आहेत. या दहशतीमुळे वाहतुक पोलिस या भागातील नो-पार्कींगमध्ये लावलेल्या गाड्यांकडे दुर्लक्ष करून कारवाई करणे टाळतात. अशीच दमबाजी पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनाही केली जाते. सुरक्षा रक्षकासही मारहाण केल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. 

प्रत्येकालाच हवी असते प्रवेशद्वाराजवळ जागा
महापालिका भवनात येणार्‍या बहुतांस नगरसेवक आणि त्यांचे कार्यकर्ते या सर्वांनाच महापौर कार्यालयाकडे जाणार्‍या प्रवेशद्वाराजवळ गाडी लावण्यास जागा हवी असते, त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झालेली असते. अनेकजण महापौैर आणि उपमहापौर यांच्या गाड्यांसाठी राखीव असलेल्या पार्कींगमध्ये सुरक्षा रक्षकांना मदबाजी करून गाड्या लावतात. महापौर किंवा उपमहापौरांची गाडी आल्यावर मात्र सुरक्षा रक्षकांचीच तारांबळ उडते. 

नव्या बस थांब्यामुळे कोंडीत होणार वाढ
महापालिके च्या विस्तारीत इमारतीसमोरील बस स्थानक पालिकेच्या पश्‍चिमेस असणार्‍या जागेत स्थलांतरीत करण्यात येणार आहे. या ठिकाणी बस स्थानक नाही पण विविध ठिकाणी जाणार्‍या बससाठी थांबा करण्यात येणार आहे. पालिका परिसरातील बेकायदा पार्कींगला आळा घातला गेला नाही तर पालिका परिसरातील वाहतुक कोंडीत मोठी वाढ होणार आहे. 

उपराष्ट्रपतीच्या दौर्‍यानंतर पोलिस कारवाई
पालिका परिसरात लावलेले नो पार्किंगचे फलक राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून काढून टाकण्यात आले आहेत. विस्तारीत इमारतीमध्ये दोन मजल्यावर पार्कींगची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यांवर वाहना पार्कींग करण्याची वेळ येणार नाही. ही पार्कींग उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर नागरिकांसाठी खुली होऊल. त्यानंतर पालिका भवनात सर्वत्र नो-पार्कींगचे फलक लावून रस्त्यांवर पार्क केलेल्या गाड्यांवर मोठा पोलिस बंदोबस्त सोबत घेऊन कारवाई केली जाईल. ही कारवाई उपराष्ट्रपतींच्या दौर्‍यानंतर हाती घेण्यात येणार असल्याची माहिती शिवाजीनगर वाहतुक शाखेच्यावतीने देण्यात आली आहे.