Wed, Feb 26, 2020 02:50होमपेज › Pune › आयुक्तांचा दावा फोल

आयुक्तांचा दावा फोल

Published On: Dec 08 2017 1:41AM | Last Updated: Dec 08 2017 1:31AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

महापालिका प्रशासनाने मांडलेल्या चालू वर्षाच्या अंदाजपत्रकातील प्रस्तावित भांडवली विकासकामांना कात्री लावण्याची वेळ आयुक्तांवरच आली आहे. तब्बल 200 कोटींपेक्षा अधिक निधीच्या वर्गीकरणाचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे वास्तववादी अंदाजपत्रक सादर केल्याचा आयुक्तांचा दावा फोल ठरला आहे. महापालिकेचे 2017-17 या वर्षांचे 5 हजार 600 कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीला 
सादर करताना हे अंदाजपत्रक वास्तववादी असल्याचा दावा आयुक्तांनी केला होता. 

मात्र, अवघ्या सहा महिन्यात आयुक्तांचा दावा फसवा निघाला आहे. महापालिकेच्या अत्यावश्यक सेवा तसेच सुरू असलेले प्रकल्प आणि योजनांसाठी अंदाजपत्रकात निधीच शिल्लक राहिला नसल्याचे समोर आले. त्यामुळे या कामांसाठी अन्य विकासकामांना कात्री लावून  तब्बल 209 कोटींचे वर्गीकरण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासंबधीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. येत्या सोमवारी होणार्‍या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यतेसाठी ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले. 

प्रामुख्याने आयुक्तांनी सुरक्षा रक्षकांच्या वेतनासाठीचा निधी कमी केला होता. समाविष्ट होणार्‍या गावांसाठी एकही रुपयांची तरतूद करण्यात आली नव्हती. मात्र सुरक्षा रक्षकांच्या वेतनासाठीची तरतूद संपली असून त्यासाठी आता निधीचे वर्गीकरणाची वेळ आली आहे. त्याचबरोबर गावे समाविष्ट झाल्याने त्यांच्या विकासकामांसाठी जवळपास 100 कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या शिष्यवृत्तीसाठी 14 कोटींची तरतूद असून प्रत्यक्षात23 कोटींच्या निधीची गरज आहे.  शाळांच्या दुरुस्तीसाठी सुमारे 27 कोटींच्या निधीची गरज आहे.

याशिवाय, कर्मचारी वेतन तसेच तातडीच्या देखभाल दुरुस्तीसह, चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या भूसंपादनासाठीही तातडीने 30 ते 40 कोटींच्या निधीची गरज आहे. त्यामुळे प्रशासनाचा अंदाज फोल ठरला असून त्यामुळेच एवढ्या मोठ्या निधीच्या वर्गीकरणाची वेळ आली आहे.