Mon, Apr 22, 2019 16:11होमपेज › Pune › पुणे : स्थायीचे अंदाजपत्रक ५ हजार ८७० कोटीचे  

पुणे : स्थायीचे अंदाजपत्रक ५ हजार ८७० कोटीचे  

Published On: Feb 27 2018 12:15PM | Last Updated: Feb 27 2018 12:19PM- गतवर्षापेक्षा ४२ कोटींनी कमी
- आयुक्तांच्या अंदाजपत्रकापेक्षा ४७३ कोटी जास्त
- नवीन योजनांचा समावेश नाही
 

पुणे : प्रतिनिधी

महापालिकेचे उत्पन्न घटल्यामुळे आयुक्तांनी आपले अंदाजपत्रक गत वर्षापेक्षा कमी केले आहे. या पार्श्वभूमीवर सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे स्थायी समितीचे ५ हजार ८७० कोटीचे अंदाजपत्रक मंगळवारी महापालिका सभागृहात सादर झाले. हे अंदाजपत्रक आयुक्तांच्या अंदाजपत्रकापेक्षा ४७३ कोटीने जास्त तर गतवर्षीच्या स्थायीच्या अंदाजपत्रकापेक्षा ४२ कोटी कमी आहे. पुणे महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे स्थायी समितीचे अंदाजपत्रक स्थायीचे मावळते अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी मंगळवारी पालिका सभागृहात सादर केले. 

महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी स्थायी समितीला ५ हजार ३९७ कोटींचे अंदाजपत्रक सादर केले होते. २०१७-१८ च्या अंदाजपत्रकापेक्षा सुमारे २०० कोटींनी यावर्षी पालिका आयुक्तांनी अंदाजपत्रक कमी केले. पालिकेला अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. बांधकाम क्षेत्रामध्ये प्रचंड मंदीचा फटका अंदाजपत्रकाला बसला. आयुक्तांनीच अंदाजपत्रकाला कात्री लावल्यामुळे स्थायी समिती अध्यक्षांसमोर पेच निर्माण झाला होता. त्यामुळे आता १६२ नगरसेवकांना ‘स’ यादीची तरतूद द्यावयाची आहे. सत्ताधार्‍यांच्या अपेक्षा वाढल्यामुळे १ कोटीपासून ५० कोटींपर्यंत तरतूदीची मागणी केली होती, अशी  माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. महापालिकेचे उत्पन्न कमी आणि खर्चामध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर स्थायीच्या अंदाज पत्रकात काही योजनांचा अपवाद वगळता नवीन योजनांचा समावेश करण्यात आलेला नाही. 

गतवर्षी ‘स’ यादीमध्ये विरोधकांना डावलण्यात आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी न्यायालयात दाद मागितली होती. शहराचा समान विकास करावयाचा झाल्यास सर्व भागाला समान पाणी निधी मिळणे आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे होते. सभासदांना स यादीची तरतूद देण्याचा अधिकार स्थायी समिती अध्यक्षांचा आहे. त्यामुळे विरोधकांबरोबर सत्ताधार्‍यांनी भल्यामोठ्या तरतूदींचे पत्र स्थायी समिती अध्यक्षांना दिली होते. 

स्थायीच्या अंदाजपत्रकातील ठळक तरतूदी : 

* समान पाणी पुरवठा योजना ही महत्त्वाकाक्षी योजना दोन हजार कोटीची आहे. यंदाच्या स्थायीच्या अंदाजपत्रकात ३२० कोटी तरतूद केली आहे.

* कोथरूड येथील बीडीपीच्या जागेवर साकैरण्यात येणाऱ्या शिवसृष्टीसाठी २५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 

* सायकल योजनेसाठी ५५ कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. 

* शहरातील कचऱ्याचा प्रश्न कायमच गंभीर स्वरुप धारण करते. या पार्श्वभूमीवर घनकचरा व्यवस्थापनासाठी १ कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

* नद्यावरील पुलाच्या सुशोभिकरणासाठी १५ कोटींची तरतूद 

* पुण्याचा इतिहास पाहिलेल्या आणि शहराच्या वाढीबरोबर विस्तारत गेलेल्या नद्यावरील पुलाचे सुशोभिकरण वैभवात भर टाकेल. या अनुषंगाने विशेष कृती कार्यक्रम आराखडा करण्यात आला. म्हणूनच या अंदाजपत्रकात यासाठी 15 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

* तळजाई टेकडी ते सिंहगड़ रस्ता बोगदा सिंहगड़ रस्ता आणि सहकारनगर पद्मावती, पर्वती ही उपनगरे थेट जोडण्याचा दृष्टीने तळजाई टेकडी येथून सिंहगड़ रस्त्याला जोडणारा बोगदा विकसित करण्याचा महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी सल्लागार नेमून प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी 2 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

* मोफत सॅनेटरी नॅपकीन व्हेडिंग मशीन महापालिकेच्या सर्व शाळांतील विद्यार्थिनींसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी १ कोटी रूपयांची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. 

* हडपसरमध्ये शहीद सौरभ फराटे यांचे स्मारक उभारण्यासाठी या अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे. 

* लाल महाल, शनिवारवाडा, नानावाडा, भिडेवाडा, विश्रामबागवाडा, महात्मा फुले मंडई या ऐतिहासिक वास्तुच्या संवर्धनासाठी अंदाजपत्रकात २० कोटी रूपयांची तरतूद