Wed, Apr 24, 2019 08:21होमपेज › Pune › एकहाती सत्ता असूनही भाजपचा पराभव 

एकहाती सत्ता असूनही भाजपचा पराभव 

Published On: Jan 31 2018 10:35AM | Last Updated: Jan 31 2018 10:34AMपुणे : प्रतिनिधी

महापालिकेत एकहाती सत्ता असूनही सत्ताधारी भाजपला मंगळवारी मुख्यसभेत पराभवाला सामोरे जावे लागले. पालिका हद्दीबाहेरील गावांमध्ये मलवाहिनी टाकण्यासाठी 10 कोटींच्या खर्चाच्या प्रस्तावासाठी शिवसेनेने भाजपला साथ दिली. तर मनसेने विरोध केला. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. प्रस्तावाच्या मंजुरीसाठी सभागृहातील एकूण सदस्य संख्येच्या 50 टक्के सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान करणे आवश्यक होते, मात्र भाजपचे अनेक सदस्य सभागृहात गैरहजर असल्याने सत्ताधार्‍यांवर ही नामुष्की ओढावली. महापालिका हद्दीलगत असलेल्या मांगडेवाडी, गुजरवाडी, निंबाळकरवाडी आणि भिलारेवाडी या गावांचे सांडपाणी कात्रज येथील पेशवेकालीन तलावात मिसळते.

त्यामुळे भागात सांडपाणी आणि मलवाहिनी टाकण्यासाठी 10 कोटींचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीनंतर मंगळवारी मुख्यसभेत मंजुरीसाठी होता. या प्रस्तावास मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी विरोध करत, चुकीच्या पध्दतीने हे काम होत असल्याची टीका केली. तर राष्ट्रवादीचे नगरसेवक बाबूराव चांदेरे यांनी याच पध्दतीने मुठा नदीत तसेच पाषाण तालावात ज्या गावांमधून सांडपाणी येते, त्या गावांमधील कामांसाठी अशाच पध्दतीने निधीची तरतूद झाली पाहिजे अशी भूमिका मांडली. योगेश ससाणे आणि भय्यासाहेब जाधव यांनी या प्रस्तावाला उपसूचना देत, या निधीतूनच मांजरी आणि शेवाळेवाडी गावांसाठीही सांडपाणी वाहिनी टाकण्याची मागणी केली.

मात्र, भाजपने ती स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे राष्ट्रवादीने ही उपसूचना मागे घेतली. त्यानंतर मनसेचा विरोध असल्याने नगरसचिवांनी प्रस्तावावर मतदान पुकारले. त्यावेळी झालेल्या मतदानात भाजप आणि शिवसेना यांची एकत्रित मतदान केल्याने प्रस्तावाच्या बाजूने 47 तर मनसेने विरोध केल्याने विरोधात एक असे मतदान झाले; मात्र हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी सभागृहातील एकूण सदस्य संख्येच्या 50 टक्के मतदान आवश्यक आहे, तेवढे मतदान झाले नसल्याचे सांगत नगरसचिवांनी हा प्रस्ताव असंमत झाल्याचे सांगितले. त्यामुळे सत्ताधारी भाजपला चांगलाच झटका बसला. त्यामुळे सभागृहात काहीसे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातच सभागृह नेते श्रीनाथ भिमाले व मनसेचे मोरे यांच्या शाब्दिक चकमक झाली.

असा झाला प्रस्ताव असंमत !

महापालिकेच्या हद्दीबाहेर गावांमध्ये विकासकामांसाठी निधी खर्च करायाचा असेल तर महापालिका अधिनियम 89 नुसार, सभागृहातील एकूण सदस्य संख्येच्या 50 टक्के सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान करणे आवश्यक आहे. महापालिकेच्या 162 मधील एका नगरसेविकेचे निधन झाले आहे, तर एका नगरसेविकेस मतदानाचा अधिकार नाही. त्यामुळे 160 पैकी 81 सदस्यांचे ठरावाच्या बाजूने मतदान होणे आवश्यक होते. मात्र, प्रत्यक्षात भाजप आणि शिवसेनेचे मिळून 74 सदस्यांनी ठरावास पाठिंबा दिला. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सदस्य तटस्थ राहिले. त्यामुळे भाजपला हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी अवघी 7 मते कमी पडली. तर प्रत्यक्षात भाजपचे तब्बल 20 हून अधिक सदस्य सभागृहात उपस्थित नसल्याने हा ठराव असमंत झाला.