Tue, Mar 26, 2019 01:35होमपेज › Pune › पुणे : शिक्षण मंडळाचा गैरव्यवहार पुन्हा एसीबीच्या रडारवर

पुणे : शिक्षण मंडळाचा गैरव्यवहार पुन्हा एसीबीच्या रडारवर

Published On: Feb 12 2018 9:05AM | Last Updated: Feb 12 2018 9:05AMपुणे : पांडुरंग सांडभोर

महापालिकेचे शिक्षण मंडळ बरखास्त झाले तरी येथील गैरव्यवहारांच्या कारभारामागील ससेमिरा मात्र अद्याप सुटलेला नाही. शिक्षण मंडळातील साहित्य खरेदीबरोबर भरतीच्या काही प्रकरणांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) नव्याने चौकशी सुरू केली आहे. गेल्या काही वर्षातील झालेल्या शैक्षणिक साहित्य खरेदी बरोबरच काही महत्वाच्या निर्णयाच्या फाईल्स एसीबीने ताब्यात घेतल्या आहेत. त्यामुळे मंडळाचे माजी पदाधिकारी आणि अधिकार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. 

महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे अस्तित्व गती वर्षी संपुष्टात आले. आता महापालिकेचा शिक्षण विभाग अस्तित्वात आला असून या विभागामार्फत कारभार सुरू आहे. मात्र मंडळ अस्तित्वात असताना गेल्या काही वर्षात साहित्य खरेदीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे प्रकार समोर आले होते. त्याचबरोबर आंतर जिल्ह्या बदल्या, खासगी शाळांमधील शिक्षण भरती यामध्ये गैरव्यवहार झाले होते. यामधील काही प्रकरणांमध्ये तर थेट एससीबीने कारवाई केली असून त्याची चौकशी सुरू आहे. तर काही प्रकरणे मात्र चौकशीविनाच दाबण्यात आली होती, मात्र ही सगळी दबलेली प्रकरणी आणि गैरकारभार एसीबीने खोदण्यास सुरवात केली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून काही प्रकरणांची एसीबीने नव्याने चौकशी सुरू केली आहे. यासंदर्भात एसीबीच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने नुकतिच आयुक्त कुणाल कुमार यांची भेटही घेतली होती. त्यानंतर आता चौकशीला वेग आला आहे. एसीबीच्या संबधित अधिकार्‍याशी संपर्क साधला असता त्यानेही मंडळाच्या काही प्रकरणांची चौकशी सुरू केली असल्याचे पुढारीच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. मात्र, चौकशी सुरू असल्याने अधिक माहिती देण्यास टाळले, तसेच हा तपास अंतिम टप्यात असल्याचे या अधिकार्‍याने स्पष्ट केले.

दरम्यान, एसीबीकडून शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीची पूर्वीपासूनच चौकशी सुरू होती. मात्र, आता नव्याने स्वेटर, बुट-मोजे या साहित्यांबरोबर चार ते पाच वर्षांपूर्वी शाळांमध्ये जे ई-लर्निग यंत्रणा बसविली होती, या अशा विषयांची खरेदीतील गैरव्यवहारांच्या चौकशींचा समावेश असल्याची माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली.

एसीबीने नव्याने केलेल्या या चौकशी मागे मंडळातील अंतर्गत राजकारणही कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे. या अंतर्गत राजकारणातून एसीबीकडे गेलेल्या तक्रारींनंतर या चौकशींना पुन्हा सुरवात झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

मंडळ कार्यालयातील कपाटांना ठोकले सील

एसीबीने चौकशी सुरू केल्यानंतर मंडळाच्या कार्यालयातील भांडार विभाग तसेच खासगी विभागातील महत्त्‍वाची कागदपत्रे आणि फाईल्स असलेल्या कपाटांना सील ठोकले आहे. यामधील काही महत्वाची कागदपत्रे एसीबीने ताब्यात घेतली असल्याचेही सांगण्यात आले.