होमपेज › Pune › पुणे-मुंबई ई-एसटी बसला खंडाळ्याचा घाट

पुणे-मुंबई ई-एसटी बसला खंडाळ्याचा घाट

Published On: Sep 06 2018 1:42AM | Last Updated: Sep 06 2018 12:31AMपुणे : निमिष गोखले

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गामुळे मुंबई सुसाट गाठणे शक्य झाल्यानंतर इंधनविरहित प्रवासासाठी पुणे-मुंबई ई-एसटी बसची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली खरी. परंतु प्रशासनाने या घोषणेला खंडाळ्याचा घाट दाखवला आहे. व्यवहार्य व पहिल्याच प्रयत्नात यशस्वी ठरेल, अशी परिस्थिती असतानाही केवळ महाग हा शिक्का मारून मुख्यमंत्र्यांची पर्यावरणपूरक एसटी योजना डेपोतच अडकणार असल्याचे सद्यःस्थितीवरून दिसते. 

पर्यावरणपूरक ई-बस बांधणीचा एकूण खर्च प्रति बस सुमारे 2 कोटी रुपये  आहे. ही बस सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी  महामंडळाला मुंबईत नुकतेच निर्देश दिले. परंतु बांधणीचा खर्च अवाढव्य असून त्याची व्यवहार्यता तपासून मगच ई-एसटी सुरू करू, असा सूर प्रशासनाने लावला आहे. 

महामंडळ सध्या मोठा अर्थिक तोटा सहन करत असल्याने राज्य सरकारने एसटी महामंडळाला अनुदान (सबसिडी) दिल्यास ई-बस लवकरच रस्त्यांवर धावेल, असे एसटीच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने नमूद केले आहे.   

ई-एसटी बसेस 250 ते 300 किमी अंतरावर असणार्‍या दोन शहरांदरम्यान चालवणे सहज शक्य असून त्यादृष्टीने पुणे-मुंबई बरोबरच पुणे-नाशिक या मार्गावर देखील अशा बसचा प्रयोग करणे व्यवहार्य ठरेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मुख्यमंत्री काय म्हणाले होते?

एसटी महामंडळाकडून संबंधित मार्गांसाठीची ई-बसची व्यवहारता तपासून परिपूर्ण अहवाल शासनास सादर करावा. एसटी महामंडळाने भविष्यात ई-बसेस घ्याव्यात.  एसटी महामंडळाबरोबरच राज्यातील इतर महानगरपालिकांनी अशा ई-बसेस घेण्याची तयारी दाखवल्यास सदर कंपनीला आपण महाराष्ट्रामध्ये उत्पादन करण्यास विनंती करू, जेणेकरून भविष्यात सदर बसचे उत्पादन मूल्य तुलनेने कमी होईल. एवढेच नाही तर, बसेसचा देखभाल खर्च अत्यल्प असल्याने तोट्यामध्ये असणार्‍या महामंडळाला या बसेस भविष्यात अत्यंत उपयुक्त ठरतील, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले होते. 

परिवहनमंत्र्यांचा देखील ग्रीन सिग्नल

परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी देखील ई-एसटी बस सुरू करण्याबाबत अनुकूलता दर्शवली आहे. पुणे-मुंबई, पुणे-नाशिक कॉरिडोअरमध्ये ई-बस सुरू करण्यास हरकत नाही. इलेक्ट्रिक बस पर्यावरणपूरक असल्याने पर्यावरणाची हानी होणार नाही. ही बस बॅटरीवर चालणार असल्याने एकदा बॅटरी फुल्ल चार्ज केल्यानंतर ती शेकडो किलोमीटर विनाचार्जिंग धावू शकणार आहे, असेही रावते म्हणाले. 

असे होणार चार्जिंग

ज्या प्रकारे लोकलच्या छतावर पेंटोग्राफ असतो त्या प्रमाणेच ई-बसच्या टपावर देखील पेंटोग्राफ असेल. ओव्हर हेड वायरमधून येणारी वीज या पेंटोग्राफमधून थेट बसमधील बॅटरीमध्ये जाणार व बॅटरी चार्ज होणार. संपूर्ण बॅटरी चार्ज होण्यास केवळ 20 मिनिटांचा अल्प वेळ लागणार आहे. एसटीच्या आगारांमध्ये बॅटरी चार्जिंगची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.   

ई-बसची वैशिष्ट्ये

एका चार्जिंगमध्ये 400 किलोमीटर धावणार
प्रदूषणविरहित प्रवास 
एसटी आगारात चार्जिंगची सोय
बसच्या इंजिनचा आवाज नाही
1.2 किलोवॅट प्रति तास ऊर्जेचा वापर
डिसेल बसेसपेक्षा निम्म्याने कमी खर्च 
ताशी 150 किलोमीटर वेगाने धावू शकणार 
दरवाजे ऑटोमॅटिक बंद होणार

असा असेल तिकीट दर 

ई-एसटी बसच्या तिकिटाचा दर सध्याच्या साधी एसटी (लाल एसटी) दरापेक्षा सुमारे 30 टक्के कमी असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला देखील ती परवडणार आहे. प्रवासी त्याची आतूरतेने वाट पाहणार एवढे मात्र नक्की.