Fri, Jul 19, 2019 22:01होमपेज › Pune › निगडीपर्यंत मेट्रो; स्वयंसेवी संस्थांचे उपोषण

निगडीपर्यंत मेट्रो; स्वयंसेवी संस्थांचे उपोषण

Published On: Feb 12 2018 2:04AM | Last Updated: Feb 12 2018 2:04AM पिंपरी  :  प्रतिनिधी

पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्याच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील सामाजिक व स्वयंसेवी संस्था आणि संघटनांच्या प्रतिनिधींनी एका दिवसांचे लाक्षणिक उपोषण आंदोलन केले. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रविवारी (दि.11) आंदोलन झाले. आंदोलनास भेट देऊन खासदार, आमदार, नगरसेवक व महापालिका पदाधिकार्‍यांनी या मागणीस  पाठींबा दिला.  

लाक्षणिक उपोषणास शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, भाजपाचे सहयोगी आमदार  महेश लांडगे, उपमहापौर शेजला मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, शिवसेनेचे गटनेते  राहुल कलाटे, नगरसेवक नाना काटे, अमित गावडे, सचिन चिंचवडे, राजू मिसाळ, उत्तम केंदळे, सचिन चिखले, तसेच, विशाल काळभोर, शिवसेना महिला शहर संघटिका सुलभा उबाळे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, मारुती भापकर, संजय लंके, अमोल भोईटे, सामाजिक कार्यकर्ते गुलाबराव सोनवणे आदींनी सहभाग घेऊन मागणीस पाठींबा दर्शविला.  

फोरमच्या सदस्यांनी पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात पिंपरीच्या पुढे निगडीपर्यंत पोहोचावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोन वेळा भेट घेतली. मात्र मुख्यमंत्र्यांनी याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. पालकमंत्र्यांनी पहिल्या टप्प्यात पुणे मेट्रो निगडीपर्यंत जाणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितल्याने नागरिकांची मोठी निराशा झाली आहे.  महापालिकेने निधी देण्यासाठी हिरवा कंदील दाखवला असूनही या कामाच्या मंजुरीसाठी अडथळे निर्माण केले जात आहेत. पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यासाठी फोरम व अन्य संघटनांच्या वतीने मागील दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे. केंद्राने  तत्वतः मंजुरी दिली असली तरी देखील इतर स्तरांवरून मागणीबाबत टाळाटाळ करण्यात येत आहे, असा आरोप फोरमने 

केला आहे. लाक्षणिक उपोषणावेळी उपस्थित नागरिकांनी पुणे मेट्रो निगडीपर्यंत पहिल्या टप्प्यात व्हावी. त्यासाठी राज्यस्तरावर सक्रिय प्रयत्न करावेत. तसेच पिंपरी ते निगडी पर्यंत मेट्रोची गरज काय? याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्यात आले. उपोषणामध्ये पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम, पोलिस नागरिक मित्र संघटना, ग्राहक पंचायत, जलदिंडी प्रतिष्ठान, आस्था फाउंडेशन, भावसार व्हिजन, ई-पिंपरी चिंचवड, स्वातंत्र्य वीर सावरकर मंडळ, एसबीआय पेन्शनर असोसिएशन, माउली ज्येष्ठ नागरिक संघ, फेडरेशन ऑफ घरकुल, संस्कार प्रतिष्ठान, तुकाराम तनपुरे प्रतिष्ठान आदी सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला.