Tue, Jul 23, 2019 06:49होमपेज › Pune › पुणे : नोकरीचे आमिष दाखवून कोट्यवधींची लूट

पुणे : नोकरीचे आमिष दाखवून कोट्यवधींची लूट

Published On: May 23 2018 1:45AM | Last Updated: May 23 2018 1:40AMपुणे ः प्रतिनिधी 

सरकारी रुग्णालये आणि सरकारी महाविद्यालयांमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून तरुण- तरुणींकडून लाखो रुपयांच्या रकमा घेऊन नोकरी न देता, त्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. टी. गोटे यांनी भाजपच्या बड्या पदाधिकार्‍यांसह नऊ जणांवर गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले. 

भाजपचे नवी मुंबई महामंत्री (अनुसूचित जाती-जमाती विभाग) जितेंद्र बंडू भोसले (49), त्यांची पत्नी स्मिता (45, दोघेही, रा. उळवे, नवी मुंबई) यांच्यासह नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत मधुकर पांडुरंग भाकरे (49, रा. केज, जि. बीड) यांनी अ‍ॅड. सतीश कांबळे यांच्यामार्फत न्यायालयात तक्रार दाखल केली होती. 

वैद्यकीय शिक्षण महाविद्यालयामध्ये शिपाई, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माता, दूरध्वनीचालक,  इलेक्ट्रिशियन, वाहनचालक, भांडारपाल, वायरमन, पहारेकरी या जागा भरायच्या आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाच्या संचालकांची आपली ओळख आहे, असे सांगून अनेकांकडून नोकरीसाठी नियुक्तीपूर्वी पैसे घेतले. त्यानंतर काही दिवसांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील, ससून रुग्णालय येथे यादी प्रसिध्द केली. ती 68 जणांनी पाहिली. विशेष म्हणजे त्यानंतर त्या उमेदवारांना बोलावून त्यांची बी. जे. मेडिकल कॉलेज आणि ससून रुग्णालय येथे मुलाखत घेण्यात आली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने रोख, धनादेश, आरटीजीएस आणि एनफटीद्वारे सर्वांकडून कोट्यवधी रुपये घेण्यात आले. 

पैसे घेतल्यानंतर या 9 जणांनी आरोग्य विभागाच्या संचालकांची बनावट सही करून युवकांना बनावट नियुक्तीपत्रेही दिली. नियुक्तीपत्र मिळाल्यानंतरही कुठे रुजू व्हायचे हेच न कळविण्यात आल्याने, आपली फसवणूक झाल्याचे या सर्वांच्या लक्षात आले आणि संबंधितांनी पैसे परत मागन्यास सुरुवात केली. 

पैसे परत मागणार्‍यांमध्ये मधुकर भाकरे यांचाही समावेश होता. त्यांनी पैसे परत देण्याची मागणी केली असता, त्यांचेे अपहरण करून त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून बेदम मारहाण करण्यात आली. याबाबत  तक्रार देऊनही पोलिसांनी राजकीय दबावापोटी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे भाकरे यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. अ‍ॅड. कांबळे यांनी न्यायालयात दाखल केलेल्या कागदपत्रांच्या आधारे न्यायालयाने बंडगार्डन पोलिसांना आदेश देताना संबंधितांवर गुन्हा दाखल करून, तपास करण्याचे आदेश दिले आहेत.