Wed, Apr 24, 2019 02:07होमपेज › Pune › पुणे-कोल्हापूर विद्युतीकरण २०२१ अखेर होणार

पुणे-कोल्हापूर विद्युतीकरण २०२१ अखेर होणार

Published On: Feb 28 2018 7:14PM | Last Updated: Feb 28 2018 7:14PMपुणे : प्रतिनिधी

पुणे-मिरज-कोल्हापूर लोहमार्गावरील विद्युतीकरणाचे काम 2021 अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. सातारा ते कोल्हापूर दरम्यानचे काम सध्या प्रगतिपथावर असून, पुणे ते सातारा दरम्यान विद्युतीकरणाचे कामदेखील लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनी दिली. बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विविध कामांची माहिती दिली.

पुणे-मिरज लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम पूर्ण होण्यास सात वर्षे लागणार आहेत. 2500 कोटी रुपयांची तरतूद त्यासाठी करण्यात आली असून, दरवर्षी 40 किलोमीटरचे दुहेरीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दौंड-बारामती विद्युतीकरण पुढील दोन वर्षांत पूर्ण केले जाणार असून, त्यासाठी 40 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पुणे-लोणावळा तिसर्‍या व चौथ्या ट्रॅककरिता 4253 कोटींची तरतूद असून, जमीन हस्तांतरणाचा तिढा सुटल्यास, येत्या पाच वर्षांत हा ट्रॅक उपनगरी लोकलकरिता वापरता येणे शक्य होणार आहे. 60 एकर अतिरिक्‍त जमीन पुणे-लोणावळादरम्यान लागणार असल्याचेही देऊस्कर यावेळी म्हणाले.

येत्या 15 दिवसांत कामशेत ते तळेगावदरम्यान ऑटोमॅटिक सिग्‍नल यंत्रणेचे काम पूर्णत्वास येणार असून, त्यानंतर पुणे ते तळेगावदरम्यान दर एक किलोमीटर अंतरावर सिग्‍नल यंत्रणा असेल. यामुळे लोकलच्या फेर्‍या वाढू शकतात. पुणे-नाशिक लोहमार्गाचा प्रकल्प अहवाल तयार झाला आहे; मात्र राज्य सरकार पन्‍नास टक्के खर्च उचलण्यास तयार नसल्याने तो रखडला आहे. हडपसर येथील टर्मिनस 2019 मध्ये पूर्ण होणार असून, नव्या सिग्‍नल यंत्रणेच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. पुणे-दौंडदरम्यान प्रत्येक दोन स्टेशनमध्ये एक सिग्‍नलिंग स्टेशन उभारण्यात येणार असून, त्यामुळे या मार्गावरील गाड्यांचा वेग व वारंवारिता वाढविता येणे शक्य होणार आहे. पुणे स्टेशनच्या पुनर्विकासाचे काम लवकरच सुरू होणार असून, येत्या 16 मार्च रोजी त्याची निविदा प्रक्रिया सुरू होईल. पुणे विभागातील एकूण पाच स्टेशनवर महिलांसाठी सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशिन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. येत्या काही दिवसांत सर्व महिला स्वच्छतागृहात सॅनिटरी डिस्पोजल मशिन बसविण्याचा विचार सुरू आहे, असे देऊस्कर यांनी सांगितले.

दहा मिनिटानंतर वाहन शुल्क

लोहगाव विमानतळावर ज्याप्रकारे वाहन 10 मिनिटांपेक्षा अधिक थांबल्यास वाहन शुल्क आकारले जाते, त्याप्रमाणेच एखाद्या प्रवाशाला सोडण्यास आलेले वाहन दहा मिनिटांपेक्षा जास्त थांबल्यास पुणे स्टेशनवरील मुख्य प्रवेशद्वारावरदेखील शुल्क आकारण्याचा विचार सुरू आहे. वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने व प्रवाशांना स्टेशनवर विनाअडथळा पोहोचता यावे, याकरिता हे पाऊल उचलण्यात येणार आहे. जे रिक्षाचालक मीटरप्रमाणे येत नाहीत किंवा प्रवासी नाकारतात, अशांवर आरपीएफ, जीआरपीकडून कारवाई करण्यात येणार असून रिक्षाचालकांनी ओला व उबेरसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या रॅम्पवर रिक्षा पार्क करू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.