Sat, Jul 20, 2019 13:31होमपेज › Pune › अटलजी म्हणाले, आपमेसे कोई चाय बना सकता है?

अटलजी म्हणाले, आपमेसे कोई चाय बना सकता है?

Published On: Aug 17 2018 8:05AM | Last Updated: Aug 17 2018 8:05AMपुणे ः प्रतिनिधी

देशाचे माजी प्रंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे अवघ्या देशाचे आदरणीय व्यक्तिमत्त्व होते. देशातील सर्व विचारधारा आणि पक्षांच्या भिंती ओलांडून त्यांनी प्रत्येक भारतीयाच्या मनात पूजनीय स्थान मिळवले होते.

तो काळ 1981 चा  होता. पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या विभागाचे सर्व विद्यार्थी अभ्यास दौर्‍यासाठी दिल्ली येथे गेले होते. तेथील अनेक संस्था, पार्लमेंट, लोकसभा, राज्यसभा, तसेच राजकारणातील उत्तुंग व्यक्तीमत्त्वांच्या मुलाखती, भेटीगाठी असा कार्यक्रम खचाखच भरलेला होता, समवेत जेष्ठ पत्रकार गोपाळराव पटवर्धन, चंद्रकांत घोरपडे, विभाग उपप्रमुख प्र. ना. परांजपे उपस्थित होते. गोपाळराव व घोरपडे सरांमुळे आम्हाला अनेक मान्यवरांना लीलया भेटी मिळत होत्या. एक दिवस यूथ होस्टेलमध्ये सकाळी घोषणा झाली. आज सकाळी 11 वाजता वाजपेयींकडे भेटीसाठी जायचे आहे. 

आनंद गगनात मावेनासा झाला. भारतीय राजकारणातील एका अत्यंत अभ्यासू , उत्तुंग व्यक्तीमत्त्वाला प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना भेटणार हेाते. पावसाळ्याचे दिवस होते. प्रत्येकी 15 मुले आणि मुली वाजपेयीजींच्या बंगल्यावर पोहचलो. त्यांच्या दिवाणखाण्यात कार्पेटवर बसलो. इतक्यात बाहेर जोरदार पावसाला सुरुवात झाली.  तेवढ्याते धोतर हातात धरत वाजपेयी स्थानापन्न झाले आणि गप्पा रंगू लागल्या.

 कविता, साहित्य, बालपणाच्या आठवणी अशा अनेक विषयांवर चर्चा सुरू होती. पाऊस वाढतच होता. गारठलेली पामेरीयन श्‍वान एका सोफ्यावर पहुडले होते. तेवढ्यात अचानक वाजपेयी उठले बोलले और बोले, बच्चों, आज मेरी नौकरानी आई नही और बारिश बहुत है. तो मैं आपको चाय भी ऑफर नही कर सकता... रूककर बोले आपमेंसे कोई चाय बना सकता है क्या? 

सर्व मुली स्वयंपाक घराकडे धावल्या. वाजपेयींनी त्यांना खूणा करून चहा, साखर, दूध कोठे ठेवले हे दाखवले. मुलींनी चहा बनविला.  वाजपेयींच्या घरी पावसामुळे तब्बल तीन तास त्यांच्याबरोबर थांबण्याचे भाग्य आम्हाला लाभले. अशी माहिती विद्यार्थी युवराज शहा यांनी दैनिक ‘पुढारी’ला दिली.