Mon, Aug 19, 2019 01:14होमपेज › Pune › सेन्सॉरशीपवर भाष्य करताना माध्यमांवर जबाबदारी

सेन्सॉरशीपवर भाष्य करताना माध्यमांवर जबाबदारी

Published On: Jan 13 2018 1:14AM | Last Updated: Jan 12 2018 10:53PM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

प्रसारमाध्यमे केवळ लोकांना रस वाटेल अशा स्वरूपात चित्रपटांबाबतची एखादी गोष्ट विपर्यस्त स्वरूपात प्रसिद्ध करतात. काही लोक ती उचलून धरतात आणि समस्या निर्माण होते. त्यामुळे, चित्रपटाच्या सेन्सॉरशिपवर भाष्य करताना प्रसार माध्यमांचीही काही जबाबदारी आहे, असे मत हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी केले.

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा (पिफ) मध्ये ‘पिफ फोरम’चे आयोजन करण्यात आले आहे, त्याच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी राज कपूर यांची मुले, प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर, रणधीर कपूर आणि राजीव कपूर यांच्या हस्ते ‘राज कपूर पॅव्हिलियन’ या मंचाचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमानंतर ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश सिप्पी यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. पिफचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी सिप्पी यांची मुलाखत घेतली.

रमेश सिप्पी म्हणाले, चित्रपटात अती हिंसा किंवा अती बीभत्सता दाखवली असेल, तर असा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालणार नाही, चांगले दिग्दर्शक हे जाणतात. ज्यांना कुणाची तरी नक्कल करायची आहे, असे लोक या गोष्टी दाखवतात. चित्रपट बनविणार्‍यांसाठी ‘सेन्सॉर’ ही नेहमीच समस्या राहिली आहे. चित्रपट करणार्‍याला नेहमी जास्तीत-जास्त स्वातंत्र्य हवे असते.

शोले चित्रपट तयार झाला तेव्हा देशात आणीबाणी होती. शोलेच्या शेवटी ठाकूर हे पात्र खलनायक गब्बर या पात्राला पायांनी मारतो, असे आधी दाखवण्यात आले होते. मात्र, चित्रपटात फार हिंसा असल्याचे कारण देत मला शेवट बदलण्यास सांगण्यात आले. मला ते मन मारून करावे लागले. आताही ज्या चित्रपटांच्या विरोधात सेन्सॉर बोर्डाने निर्णय दिला असेल, त्याविरोधात लोक लढा देतील.

बोली भाषेमुळे ‘शोले’च्या संवादाला लय

मुलाखती दरम्यान ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी त्यांच्या गाजलेल्या हिंदी चित्रपटांच्या आठवणी ताज्या केल्या. त्यावेळी ते म्हणाले, आज 42 वर्षांनंतरही ‘शोले’ हा चित्रपट आजच्या काळाशी सुसंगत वाटेल, असे मला चित्रपट बनवताना अजिबात वाटले नव्हते. ‘अंदाज’ आणि ‘सीता और गीता’ या दोन चित्रपटांनंतर मला एखादा ‘अ‍ॅक्शन-अ‍ॅडव्हेंचर’ चित्रपट करायचा होता. सलीम-जावेद यांनी रचलेले संवाद अतिशय साधे-सोपे होते. त्यातील बारकाव्यांवर काम केल्यानंतर ते साधे संवाद लक्षात राहिले. उत्तर प्रदेशातील बोली भाषेचा लहेजा वापरून अमजद खान यांनी म्हटलेल्या गब्बर सिंगच्या संवादांमध्ये एक लय आली.