Sun, Nov 18, 2018 19:46



होमपेज › Pune › पुणे : डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच 'दीपक'चा मृत्यू 

पुणे : डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच 'दीपक'चा मृत्यू 

Published On: Jan 03 2018 8:38PM | Last Updated: Jan 03 2018 8:38PM

बुकमार्क करा




 पुणे ः प्रतिनिधी

पर्वती येथील चैतन्य हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेदरम्यान दीपक दवे या तरूणाचा मृत्यू डॉक्टरांच्याच निष्काळजीपणामुळे झाला असल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी रुग्णालयातील तीन डॉक्टरांवर दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

डॉ. अनंत एकनाथ बागुल (वय ५४, रा. पर्वती), डॉ. सचिन जमादार (वय ३५, रा. कात्रज) आणि डॉ. विशाल रविंद्र भंडारी (वय ३६, रा. संतनगर, अरण्येश्‍वर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या डॉक्टरांची नावे आहेत. त्यांच्यावर भादंवि कलम ३०४-अ (निष्काळजीपनामुळे मृत्यू) यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लक्ष्मीनगर, पर्वती येथे राहणा-या दीपक कांतीलाल दवे (वय २९) हा १४ जून २०१७ रोजी घरी दुचाकी स्टँडवर लावताना उजव्या हातावर पडला होता. यामध्ये त्याच्या हाताच्या कोपराला दुखापत झाली होती. त्यावर उपचार करण्यासाठी तो दुस-या दिवशी १५ जूनला निलायम पुलाजवळील सिंहगड रोडवरील चैतन्य हॉस्पिटल येथे सकाळी साडेअकरा वाजता गेला होता. तेथे त्याला डॉक्टरांनी हाताचे ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले. यानुसार त्याला डॉ. विशाल भंडारी यांनी भूल दिली. पण नंतर तो भूलीतून बाहेर आला नाही. दरम्यान, त्याला चैतन्य हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सायंकाळी पाच वाजता डेक्कन येथील सहयाद्री रुग्णालयात हलविण्यात आले. पण तेथे तासाभरात त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारामुळे मृत्यू झाल्याचा आरोप दीपकच्या नातेवाईकांनी केला. त्यामुळे त्याचे ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले व व्हिसेरा राखून ठेवण्यात आला होता. तसेच नातेवाईकांनी डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत दत्तवाडी पोलिसांकडे तक्रार दिली होती.

यानंतर दत्तवाडी पोलिसांनी नातेवाईकांचा जबाब व दीपकवर उपचार केलेली कागदपत्रे ससून रुग्णालयाच्या मेडिकल बोर्डकडे पाठवून दिली होती. यावर ससून रुग्णालयाच्या मेडिकल बोर्डच्या समितीने या प्रकरणातील  कागदपत्रांची पाहणी करून दत्तवाडी पोलिसांना पत्र दिले होते. ससूनची कागदपत्रे व नातेवाईकांनी दिलेल्या माहितीवरून हा  गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती तपास अधिकारी व दत्तवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) कृष्णा इंदलकर यांनी ‘पुढारी’शी बोलताना दिली.

फुप्फुसात अन्नाचे कण अडकल्याने मृत्यू

दीपक  दवेवर उपचार करणा-या डॉक्टरांनी दीपकच्या पोटात अन्न आहे की नाही याची तपासणी करणे आवशक होते. मात्र, डॉक्टरांनी ही तपासणी न केली नाही. त्याला उलटी झाल्याने त्याच्या पोटातील अन्नकण फुप्फुसामध्ये गेल्याने त्याचा श्‍वासोच्छवास थांबला. तरीही डॉक्टरांनी रुग्ण ऑपरेशनसाठी सक्षम आहे की नाही याची खात्री न करता भूल दिल्यामुळे व कर्तव्यामध्ये निष्काळजीपणा दाखविल्यामुळेच दीपकचा मृत्यू झाल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले. 

 जे. जे. कडून परत तपासणी करणार

दत्तवाडी पोलिासांनी ससून रुग्णालयाच्या मेडिकल बोर्डकडून दोन वेळा दीपक दवेचा मृत्यू कशामुळे झाला याचे मत मागवले होते. मात्र, यामध्ये नेमका मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ठ होत नाही. म्हणून ही फाईल मुंबईतील जे. जे. रुग्णालयातील मेडिकल बोर्डकडे पाठवण्यात येणार असून त्यांचे मत मागविण्यात येणार आहे. 

    - कृष्णा इंदलकर, पोलिस निरीक्षक (गुन्हे), दत्तवाडी पोलिस स्‍थानक