Sun, Jul 21, 2019 08:17होमपेज › Pune › नाआवडत्या ‘डेमू’ची आज वर्षपूर्ती

नाआवडत्या ‘डेमू’ची आज वर्षपूर्ती

Published On: Mar 25 2018 2:12AM | Last Updated: Mar 25 2018 2:11AMपुणे : प्रतिनिधी 

पुणे-दौंड दरम्यान सुरू करण्यात आलेल्या बहुचर्चित ‘डेमू’ला (डिझेल मल्टिपल युनिट) आज (रविवार, दि. 25) एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षभरात प्रवाशांची अतिशय नाआवडती रेल्वे गाडी असा लौकिक या ‘डेमू’ने मिळविला आहे.  मागील वर्षी तत्त्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी कोल्हापूर येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे डेमूचे औपचारिक उद्घाटन केले होते. पुणे स्थानकावरून दुपारी अडीच वाजता ती दौंडकडे रवाना झाली. त्यावेळी पुणे स्थानकावर राजकीय नेत्यांचा गोतावळा दिमतीला होता.

डेमू सुरू झाल्यामुळे भविष्यात रेक वाढून फेर्‍या वाढतील, अशी अशा प्रवाशांना होती. मात्र, सदोष डेमूमुळे ती प्रवाशांच्या पंसतीस उतरलीच नाही. प्रवाशांचा रेटा पाहता डेमूचे घाईघाईत उद्घाटन करण्यात आले. डेमू सुरू करण्याचे श्रेय घ्यायला मात्र सर्वच राजकीय पक्षांमध्ये चढाओढ निर्माण झाल्याचे दिसून आले. डेमू सुरू झाल्यानंतर 15-20 दिवसांनी त्याचे वेळापत्रक पुणे विभागाकडून घोषित करण्यात आले. पुण्याहून दौंडला दोन व दौंडहून पुण्याला दोन फेर्‍या होऊ लागल्या. त्याचबरोबर पुणे-दौंड-बारामती अशी एक फेरीही सुरू करण्यात आली. सुरुवातीला डेमूचे तीन रेक पुणे यार्डात दाखल झाले होते. कालांतराने पंधरा डब्यांच्या दोन डेमू करण्यात आल्या. 

वारंवार डेमूमध्ये या ना त्या कारणाने तांत्रिक दोष निर्माण होत तिला सातत्याने उशीर होऊ लागल्याचे दिसून आले. दरम्यानच्या काळात दौंडहून सकाळी 7.05 वाजता सुटणारी सर्वांची लाडकी शटल डेमू सुरू झाल्यामुळे अचानक बंद करण्यात आली. मात्र सदोष डेमूमुळे प्रवाशांना पुण्यात दाखल होण्यास सातत्याने उशीर होऊ लागल्याचे दिसून आल्यानंतर शटल सेवा पुन्हा सुरू करण्यात आली व दौंडहून पुण्याला येणारी सकाळची डेमू बंद करण्यात आली.  

17 एप्रिल 2017 रोजी पुण्याहून दौंडकडे जाणार्‍या डेमूच्या एका डब्याला मांजरी स्थानकात आग लागली. ब्रेक लाइनरमध्ये स्पार्क झाल्याने आग लागल्याचे नंतर निष्पन्न झाले. त्यानंतर बरेचदा लहान-मोठे अपघात घडत गेल्यामुळे धोकादायक डेमूतून प्रवास करण्याचे प्रवासी टाळू लागले.  एक-दोनदा तर डेमूतील इंधन संपल्याचा प्रकार उघडकीस आल्याने रेल्वेवर मोठी नामुष्की ओढवली.  
 

 

 

tags : pune,news,Pune,Daund ,Demu,Railway, inaugurated, train,issue