Tue, Jul 23, 2019 04:03होमपेज › Pune › ठणकावून सांगतो पुण्याची जागा काँग्रेसचीच : हर्षवर्धन पाटील

ठणकावून सांगतो पुण्याची जागा काँग्रेसचीच : हर्षवर्धन पाटील

Published On: May 27 2018 1:21AM | Last Updated: May 27 2018 12:41AMपुणे : प्रतिनिधी

पुण्याची लोकसभेची जागा काँग्रेसला मिळणार नाही, असा दावा कोणीही करीत असेल, तर मी ठणकावून सांगतो, पुण्याची जागा काँग्रेसचीच आहे आणि काँग्रेसचाच उमेदवार याठिकाणी असेल, अशा शब्दात काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्युत्तर दिले आहे.

पुणे कॅन्टोमेन्ट विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पाटील बोलत होते. या मेळाव्याला माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके, हर्षवर्धन पाटील, शहराध्यक्ष रमेश बागवे. आमदार अनंत गाडगीळ, माजी आमदार  मोहन जोशी, काँग़्रेसचे गटनेते अरविद शिंदे, अभय छाजेड, सदानंद शेट्टी, अविनाश बागवे, लता राजगुरु आदी उपस्थित होते. 
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पुण्यात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची ताकद जास्त असल्याचे सांगत, पुण्याच्या जागेवर दुसर्‍यांदा दावा केला होता.

त्यावर  बोलताना पाटील म्हणाले, दोन, तीन वेळा झालं, वर्तमान पत्रात वाचायला मिळाले, आता काँग्रेसला पुण्याची जागा मिळणार नाही. मात्र, काहीही झाल तर पुण्याची जागा काँग्रेसकडे असेल. काँग्रेस पक्षाने तळागळात काम केले आहे. शहराचा विकास काँग्रेसमुळेच झाला आहे. हे विसरुन चालणार नाही. काँग्रेसने आत्तापर्यंत अनेक पदाधिकारी तयार केले. कोणी आमदार झाले, कोणी नगरसेवक झाले, तर कोणाला पक्षाचे पद मिळाले. या सर्वांनी आता पक्षाला जुने वैभव आणून देण्याचे काम करून दाखविण्याची गरज आहे. त्यासाठी लोकांमध्ये जाऊन कामे केली पाहिजेत. फक्त मला तिकीट मिळाले तर काँग्रेस, अन्यथा बिगर काँग्रेस, हे आता चालणार नाही. 

दुर्दैवाने हे लोक पुन्हा आले, तर पुढच्या चार पिढ्या उद्ध्वस्त होतील. त्यांना आत्ताच रोखण्याचे काम केले पाहिजे अशा शब्दात पाटील यांनी भाजपवर टिका केली. यावेळी वसंत पुरके यांनीही केंद्र व राज्य सरकारच्या कारभारावर सडकून टिका केली.