Sat, Nov 17, 2018 23:20होमपेज › Pune › आता तरी सुरू करा विकासकामे

आता तरी सुरू करा विकासकामे

Published On: Jan 16 2018 2:15AM | Last Updated: Jan 16 2018 12:24AM

बुकमार्क करा
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड : शिवाजी शिंदे

व्दिशताब्दी वर्ष साजरे करीत असलेल्या पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने मागील तीन महिन्यांत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जोरदार उत्साह साजरा केला. अर्थात, व्दिशताब्दी कार्यक्रमासाठी खर्चदेखील तेवढ्याच पटीने केला, ही बाब अलाहिदा. या कार्यक्रमातून अधिकारी आणि नगरसेवकांनी स्वत:ला चांगलेच मिरवून घेतले आहे. 

व्दिशताब्दी कार्यक्रमाबरोबरच केंद्र शासनाचा  अविभाज्य भाग बनलेला ‘स्वच्छता पंधरवडा’ कॅन्टोन्मेंटच्या हद्दीत आता वारंवार साजरा करण्यास सुरुवात झालीय. वारंवार होत असलेल्या या स्वच्छता अभियानाचा प्रशासनातील अधिकर्‍यांसह कर्मचार्‍यांनी चांगलाच धसका घेतला आहे. स्वच्छता म्हणजे विकास नव्हे,  अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. त्यामुळे नगरसेवक, प्रशासन आणि वरिष्ठ अधिकार्‍यांनी कार्यक्रमाची अंगावर चढवलेली धूळ झटकून विकासकामे करण्याकडे लक्ष द्यावे, असे आता नागरिक म्हणू लागले आहेत.

 पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून केवळ आणि वारंवार स्वच्छता पंधरवडा हाच कार्यक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम निश्‍चितच कौतुकास्पद आहे. मात्र, एखादा उपक्रम वारंवार होऊ लागला, की नागरिक आणि प्रशासनातील अधिकारी, तसेच कर्मचारीसुद्धा वैतागलेले असतात, मग अशा वेळी एखाद्या चांगल्या उपक्रमाची फटफजिती होऊ शकते. त्यामुळे केवळ स्वच्छता म्हणजे विकासकाम नव्हे. इतर अनेक विकासकामे आहेत, जी मागील काही वषार्र्ंपासून रखडलेली आहेत. त्यातही अतिशय महत्त्वाचे म्हणजे नागरिकांसाठी असलेले ‘आधारकार्ड’ काढण्याची कोणतीही यंत्रणा प्रशासनाकडे उपलब्ध नाही. त्यातच गेल्या काही दिवसांपासून आधारकार्ड सक्तीचे होऊ लागले आहे.  एकीकडे आधार सक्ती आणि दुसरीकडे प्रशासनाकडे उपलब्ध नसलेली यंत्रणा यांमुळे नागरिकांचे चांगलेच हाल होऊ लागले आहेत. 

विविध कामांसाठी आधारकार्डची गरज आहे. ही यंत्रणा उपलब्ध करू देण्यासाठी प्रशासन त्याचबरोबर नगरसेवकांनी प्रयत्न करणे नियमानुसार बंधनकारक आहे. मात्र, त्यावर कोणीही प्रयत्न करीत नसल्याचे दिसून येत आहे. 

अनेक विकामकामे रखडलेली आहेत. त्यावर कोणतीही चर्चा होताना दिसत नाही. वॉर्डात बसविण्यात आलेले ‘वॉटर एटीएम’ मधील कित्येक एटीएम अजून सुरू झाले नाहीत, तर काही बंद पडले आहेत.  बंद पडलेल्या एटीएमची दुरुस्ती अजूनही झालेली नाही. त्यामुळे नागरिकांना शुद्ध  पाणी मिळणे अवघड झाले आहे. हद्दीतील बहुतांशी  रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. मात्र, त्याकडे बांधकाम विभागातील अभियंते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी करण्यास सुरुवात केली आहे. 

याशिवाय विकासकामांची यादी लांबलचक आहे. मात्र, त्यामधील कित्येक कामांकडे अजूनही नगरसेवक आणि प्रशासनातील अधिकार्‍यांनी लक्ष दिले नाही.  त्यामुळे ही कामे केव्हा होणार, हा मुद्दा बासनात गुंडाळून ठेवण्यात आला आहे.