Sat, Apr 20, 2019 23:54होमपेज › Pune › पुण्यात फिल्मी स्टाइलने घातला भरदिवसा दरोडा

पुण्यात फिल्मी स्टाइलने घातला भरदिवसा दरोडा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर फिल्मी स्टाइलने 27 लाख 60 हजारांची रोकड पळविल्याचा प्रकार सोमवारी दुपारी घडला. दोन दुचाकीवर आलेल्या दोघा लुटारूंनी पेट्रोल पंपावर जमलेली रोकड बँकेत घेऊन जाताना कार अडवून कोयत्याच्या धाकाने लुटली. भरदिवसा हा प्रकार घडल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. दरम्यान एक दुचाकी तेथेच सोडून दुसर्‍या दुचाकीवर दोघे पसार झाले. याप्रकरणी अ‍ॅन्थनी बर्मन (45, रा. मार्केटयार्ड) यांनी फिर्याद दिली आहे. 

त्यानुसार, मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल केला.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बर्मन हे धनकवडी भागातील शंकर महाराज मठाशेजारी असणार्‍या नसरवाण पेट्रोल पंपावर कामास आहेत. पंपावर दररोज जमा केलेली रोकड बँकेत भरली जाते. मात्र, शनिवारी आणि रविवारी बँकांना सुट्टी होती. त्यामुळे या दोन दिवसांमध्ये पेट्रोल पंपावर जमलेली रोकड बँकेत भरली गेली नव्हती. 

दरम्यान, सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास मॅनेजर गजानन पवार यांनी कामगार अजय परदेशी (वय 44, रा. धनकवडी) यांना बोलावले. त्यांना ड्रॉवरमध्ये ठेवलेले पैसे काढण्यास सांगितले. त्यानुसार, त्यांनी शंभर, पाचशे व दोन हजार रुपयांचे बंडल काढले. त्यानंतर पवार यांनी ही रोकड एका काळ्या रंगाच्या स्कूल बॅगमध्ये भरली. तसेच, परदेशी यांना फिर्यादी अ‍ॅन्थनी बर्मन यांना सोबत घेऊन भवानी पेठेतील बँक ऑफ इंडियात भरण्यास सांगितले.

परदेशी यांना बॅगेत किती रक्कम आहे, हे माहिती नव्हते. परदेशी व बर्मन हे एका कारने पैशांची बॅग घेऊन बॅँकेकडे निघाले. बर्मन हे कार चालवत होते. ते बिबवेवाडी-मार्केटयार्ड रोडने चंद्रलोक रुग्णालय चौकात आले. तेथून बिबवेवाडी-कोंढवा रोडने लाईट हाऊसमोर साडेअकराच्या सुमारास आले असता अचानक सीबीझेड दुचाकीवरून आलेल्या एकाने कारला दुचाकी आडवी लावून खाली पाडली. त्यामुळे बर्मन यांनी कार थांबवली. त्यानंतर तो परदेशी बसलेल्या डाव्या बाजूला आला व त्यांने घातक हत्यार हातात घेऊन दार उघडले.

तसेच, त्यांच्याजवळील काळी स्कूल बॅग घेण्याचा प्रयत्न केला. परदेशी यांनी प्रतिकार करताच त्याने त्यांच्यावर हत्यार उलट्या बाजूने मारले. त्यामुळे त्यांनी बॅग सोडली. त्या वेळी तो बॅग घेऊन थोड्या अंतरावार पल्सर दुचाकीवर उभा असलेल्या व्यक्तीसोबत निघून गेला. बर्मन यांनी खाली उतरून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत ते दोघेही पसार झाले. त्यानंतर दोघांनी प्रथम पेट्रोल पंपाचे मॅनेजर पवार व इतरांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली. 

दरम्यान, भररस्त्यात व रहदारी असणार्‍या ठिकाणी हा प्रकार घडल्यानंतर नागरिकांनी घटनासस्थळी मोठी गर्दी केली होती. या घटनेची माहिती शहरात वार्‍यासारखी पसरली. त्यानंतर मोठी खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच मार्केटयार्ड व बिबवेवाडी पोलिसांनी आणि गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी धाव घेतली. या प्रकरणी अधिक तपास मार्केटयार्ड पोलिस करत आहेत. 

पाळत ठेवून रोकड लुटल्याची शक्यता

पंपावर जमलेली रोकड दररोज बँकेत भरली जाते. दोन दिवस बँका बंद असल्याने पेट्रोल पंपावरील रोकड भरण्यात आली नव्हती; त्यामुळे 27 लाख 60 हजाराची रोकड जमली होती. ती बँकेत घेऊन जाताना हा प्रकार घडला. दरम्यान लुटारूंनी पाळत ठेवून ही रोकड लुटली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.  लुटारू परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. कारसमोर आडवी लावलेली सीबीझेड दुचाकी दरोडेखोरांनी तेथेच टाकून दिली असून, ही दुचाकी चोरीची असल्याचे सांगण्यात येत आहे. गुन्हे शाखेसह मार्केटयार्ड पोलिस तपास करत आहेत. 


  •