Fri, Jul 10, 2020 20:27होमपेज › Pune › एकबोटे, भिडे गुरुजींविरोधात आणखी एक तक्रार 

एकबोटे, भिडे गुरुजींविरोधात आणखी एक तक्रार 

Published On: Jan 03 2018 9:59PM | Last Updated: Jan 03 2018 9:59PM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

भीमा कोरेगाव येथील हिंसेप्रकरणी शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात आज येरवडा पोलिस ठाण्यात आणखी एक तक्रार अर्ज आला आहे. हा प्रकार भीमा कोरेगाव येथील असल्याने आम्ही ही तक्रार शिक्रापूर पोलिस ठाण्याकडे वर्ग केली असल्याचे येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकुंद महाजन यांनी दिली. 
याआधीच मंगळवारी एकबोटे व भिडे गुरुजी यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी, खुनी हल्ला, दंगल, हत्यारबंदीचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांनी ही तक्रार दिली आहे. 

भीमा कोरेगाव येथील विजयाला दोनशे वर्ष पूर्ण झाली आहेत. मागील पंचवीस वर्षांपूर्वीपासून आम्ही तेथे स्तंभाला मानवंदना देण्यासाठी येतो. मागील पंचवीस वर्षांपासून कोरेगाव भीमा येथील स्थानिक नागरिक व रहिवासी यांचा कधीही विरोध व आक्षेप नव्हता. मात्र हिंदू संघटनेचे मिलिंद एकबोटे, शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी पूर्व नियोजित कट रचून भीमा कोरेगाव येथील रहिवाशांना संपूर्ण गावात बंद ठेवण्यासाठी प्रोत्साहन व चिथावणी देऊन सामाजिक तेढ निर्माण करण्याचे कृत्य केले. तसेच आठशे ते हजार कार्यकर्त्यांनी तोडफोड करत लोकांना जखमी केले. या सर्व प्रकरणात व दंगल घडवून आणण्यात मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे गुरुजी व स्थानिक रहिवासी गव्हाणे व फडतरे तसेच त्यांचे ८०० ते १००० लोक जबाबदार असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.  

दरम्यान, ही तक्रार आम्ही घेऊन शिक्रापूर पोलिसांकडे पुढील कारवाईसाठी पाठविली असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकुंद महाजन यांनी सांगितले.