पुणे : प्रतिनिधी
जलपर्णीच्या वादग्रस्त निविदेवरून महापौरांच्या दालनात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आंदोलन सुरू असताना दालनात आलेल्या अतिरिक्त पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण झाली. नगरसेवकांना उद्देशुन निंबाळकर यांनी वक्तव्य केल्याने हा गोंधळ झाल्याचे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
जलपर्णिची निविदा आठपट दराने काढल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी सोमवारी दुपारी महापौर मुक्ता टिळक यांच्या दालनात बैठे आंदोलन केले. दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करा, अशी मागणी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी यावेळी केली. हे आंदोलन सुरू असताना इस्टीमेट कमिटीचे प्रमुख असलेले अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर हे तेथे आले. ते निवीदेसंबंधी महापौरांना माहिती देत होते.
"ज्या अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली निविदा प्रक्रिया राबवली, त्यांच्याकडून खुलासा नको. अधिकारी चोर आहेत", असा आरोप नगरसेवक रविंद्र धंगेकर यांनी केला. त्याला प्रत्युत्तर देताना निंबाळकर म्हणाले, "असे ऐकून घ्यायला आम्ही आलेलो नाही, अशा प्रकारचे अपशब्द वापरल्यामुळे नगरसेवक संतप्त झाले. तुम्ही आमची लायकी काढणारे कोण, असे म्हणत निंबाळकर यांना जाब विचारू लागले. त्यावेळी येथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी निंबाळकर यांच्या श्रीमुखात लगावली. यामुळे वातावरण अधिकच तापले. सुरक्षा रक्षकांनी निंबाळकर यांना तेथून बाहेर नेले. अतिरिक्त आयुक्तांच्या उत्तरावर महापौरांनीही नाराजी व्यक्त केली.
तत्पूर्वी, आयुक्तांशी संवाद साधून जलपर्णी काढण्याची निविदा रद्द करण्याचे आदेश दिले. तसेच या निविदेची चौकशी चोवीस तासात करून त्यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी, असे आश्वासन विरोधकांना दिले.
यावेळी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष चेतन तुपे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांच्यासह दोन्ही पक्षाचे नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.