Wed, Jul 24, 2019 08:04होमपेज › Pune › पुणे : दोन महिन्यात २५ प्रेमी युगुलांची 'सैराटगिरी'

पुणे : दोन महिन्यात २५ प्रेमी युगुलांची 'सैराटगिरी'

Published On: May 07 2018 10:31AM | Last Updated: May 07 2018 10:31AMयवत : वार्ताहार

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वरवंड परिसरात सैराट फिवर आला आहे. गेल्या दोन महिन्यात या परिसरातून सैराटगिरी करत जवळपास २५ हून अधिक प्रेमी युगलांनी धूम ठोकली आहे. यात अल्पवयीन व किशोरवयीन मुलींचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे 

फेसबुक आणि व्हॉट्सॲपच्या अतिरेकामुळे मुली सहज मुलांच्या जाळ्यात फसत असून या गोष्टीचा मोठा मनस्ताप मुलींचे आई वडील व कुटुंबियांना सहन करावा लागत आहे. १८ वर्ष मोठ्या कष्टाने आई-वडिलांनी सांभाळ केलेली मुले काही क्षणात कुटुंबाचे उपकार विसरून जात असल्याने कुटुंबीयांवर मोठा मानसिक आघात होत आहे. परंतु, कायद्याच्या बंधनात त्यांचा प्रेमविवाह कुटुंबीय हताशपणे पाहात आहेत. लग्‍न आणि जबाबदारी न कळण्याच्या वयात एवढा महत्त्‍वाचा निर्णय घेतल्याने परिसरातील पालक चिंतेत आहेत.

प्रेम विवाहाला विरोध नाही. परंतु, आपल्या आयुष्याचा जोडीदार कोणताही विचार न करता मुली भावनिकतेतून निवडत आहेत. त्यामुळे त्यांच्या भविष्याबाबत पालकांमध्ये चिंता आहे. हा सर्व प्रकार थांबण्यासाठी गावातील ज्येष्‍ठ मंडळींच्या पुढाकाराची गरज असल्याची चर्चाही सुरू आहे. 

या सर्व प्रकारावर बोलताना वरवंडचे पोलिस पाटील किशोर दरेकर यांनी सांगितले की, आजकाल मुली व मुले जास्‍त वेळ कॉलेज, फेसबूक आणि व्‍हॉट्‍सॲपच्या सानिध्यात असतात. आई-वडीलही त्यांना कमी वेळ देतात. असे प्रकार थांबावेत यासाठी समुपदेशनाची गरज आहे. 

पोलिसांचा धाक राहिला नाही

वरवंड भागात महाविद्यालयामुळे मोठ्या प्रमाणात बाहेर गावावरून विध्यार्थी या ठिकाणी येतात. महाविद्यालयाची सुट्टी झाल्यानंतर या परिसरात मुलांची टोळकी उभी असतात. त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी देखील अनेक वेळा करण्यात आली आहे. परंतु, पोलिस यात लक्षच देत नाहीत. परिणामी याचा गैरफायदा मुले घेत असल्याचे चित्र आहे.