होमपेज › Pune › गणेशोत्सवानिमित्त पूजापत्री साक्षरता अभियान

गणेशोत्सवानिमित्त पूजापत्री साक्षरता अभियान

Published On: Sep 06 2018 1:42AM | Last Updated: Sep 06 2018 12:46AMपुणे : प्रतिनिधी

गणेशोत्सवानिमित्त गणपतीला वाहण्यासाठी पूजापत्रींचा वापर करण्यात येतो. मात्र अनेकदा अशा गणेशपत्रींच्या नावाखाली भेसळ आणि दुर्मिळ वनस्पतींची विनाकारण तोड करण्यात येते. याबाबत योग्य गणेशपत्रींबाबत जनजागृती करण्यासाठी ‘बायोस्फिअर्स’ संस्थेतर्फे पूजापत्री साक्षरता मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत धार्मिक शास्त्रात नमूद 21 पूजापत्रींबाबत ‘गणेश पूजापत्री : परंपरा, पर्यावरण आणि प्रबोधन’ हे माहितीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

धार्मिक शास्त्रात नमूद केलेल्या सर्व पत्री वनौषधी असून, त्या आपल्या शरीरास तसेच निसर्गासाठीही उपयुक्त आहेत. या वनस्पतींबद्दल जागृती आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने पूर्वजांनी धार्मिक विधींमध्ये त्यांचा समावेश केला. पत्रीमधील वनस्पतींमध्ये विविध रोगांवर प्रतिबंधनात्मक उपाय करण्याचे सामर्थ्य आहे. मात्र, अलीकडील काही वर्षांत गणेशोत्सवामध्ये विक्रीसाठी येणार्‍या पत्रींमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत आहे. पत्रीत समावेश नसलेल्या काही दुर्मिळ, प्रदेशनिष्ठ आणि औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणात तोडण्यात येत आहेत. तसेच, विदेशी वनस्पतींही मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात, असे ‘बायोस्फिअर्स’चे संस्थापक डॉ. सचिन पुणेकर यांनी सांगितले. लोकांमध्ये पत्रींबाबत जागृती करण्यात यावे यासाठी गेल्या दोन वर्षांपासून संस्था प्रयत्न करत आहे. त्यासाठी पूजा पत्री साक्षरता मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये खरी गणेश पूजापत्री कुठली, पत्रीच्या नावचे श्लोक कुठले, भेसळ होणार्‍या वनस्पतींबद्दल माहिती देण्यात आली आहे, असे पुणेकर यांनी सांगितले.

या आहेत 21 गणेश पूजापत्री 

आघाडा, शमी, डोरली, केवडा, कण्हेर, रुई, अर्जून पिंपळ, निरगुडी, जाई, हादगा, मधुमालती, माका, बेल, दुर्वा, बोर, धोत्रा, तुळस, विष्णुक्रांत(शंखपुष्पी), डाळींब, देवदार,मरवा.

पत्रीच्या नावाखाली ओरबडल्या जाणार्‍या दुर्मिळ वनस्पती 

कचोरा(रान हळद) सफेद मुसळी, चवर,कळलावी, भुई आमर्‍या, रानआले, महाळुंग,भारंगी.

पुजापत्रीत भेसळ होणार्‍या वनस्पती 

गुडमई, तेरडा, सुबाभूळ, आंबा, उंदीरमारी, गुलबक्षी, शंकासूर, खैर, ऑस्ट्रेलियन बाभूळ, सीताफळ, वेडीबाभूळ,पर्जन्यवृक्ष.