होमपेज › Pune › झाडे बनताहेत ‘पब्लिसिटी स्पॉट’

झाडे बनताहेत ‘पब्लिसिटी स्पॉट’

Published On: Jul 28 2018 1:39AM | Last Updated: Jul 27 2018 10:14PMपिंपरी : प्रतिनिधी

सध्या स्मार्ट सिटीच्या दिशेने शहराची वाटचाल सुरू असून शहरातील झाडांकडे मात्र प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. शहरातील झाडांवर सध्या वेगवेगळ्या शॉप्स, इन्स्टिट्यूट तसेच विविध प्रकारच्या उत्पादनांच्या जाहिराती लावण्यात येत आहेत. त्यामुळे झाडांचे विद्रुपीकरण होत असून झाडे ही  निव्वळ पब्लिसिटी स्पॉट बनू लागली आहेत. शहरातील विविध भागात डेरेदार झाडे आहेत. परंतू या झाडांवर वेगवेगळ्या प्रकारच्या जाहीराती खिळ्ंयासह ठोकण्यात येत आहेत. त्यामुळे झाडांचे नुकसान तर होत आहेच परंतू या फलक लावणार्‍यावर प्रभावी कारवाई करण्यात आलेली नाही. त्यांना प्रत्येक वेळी समज देउन सोडून देण्यात असल्यामुळे दिवसेंदिवस हे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. शहरात सध्या विविध भागातून खिळेमुक्त झाडांचे अभियान सुरु आहे. परंतू केवळ या अभियानामुळे काही होणार नसून संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली तरच हे प्रमाण कमी होईल अशी मागणी नागरिकांतून होत आहे. 

झाडांकडे संबंधित अधिकार्‍यांचे दुर्लक्ष

ग्रीन सिटी म्हणून प्रयत्न करणे तर सोडाच परंतु आहे त्याच झाडांना नुकसान पोहचवाण्याचे काम काही व्यावसायींकांकडून केले जात आहे. यामुुळे महापालिकेला मिळणारे उत्पन्न तर बुडतेच आहे परंतू झाडांचे नुकसान होत आहे. राज्य शासन, महापालिका तसेच वनविभागाकडून एकीकडे पर्यावरण संरक्षणासाठी कोटीच्या कोटी झाडे लावण्याचे अभियान राबवण्यात येत आहे. मात्र शहरातील जुनी झाडे व नुकतीच लावलेली झाडांचे रक्षण करण्यास महापालिका अधिकारी रस घेत नसून अधिकारी आपल्या केबीन मधून बाहेर पडण्यासच तयार नसल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे.