होमपेज › Pune › शिवाजी राजांचे हिंदुत्व काढून घेणे केवळ राजकारणासाठी : प्रदीप रावत

शिवाजी राजांचे हिंदुत्व काढून घेणे केवळ राजकारणासाठी : प्रदीप रावत

Published On: May 28 2018 1:38AM | Last Updated: May 28 2018 1:02AMपुणे : प्रतिनिधी 

छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुत्व काढून घेण्याचे काम काही तथाकथित बुद्धिवादी केवळ राजकारणासाठी करत आहेत. मात्र त्यामुळे इतिहासाचे वास्तव बदलणार नाही. हिंदुस्थानचे आजचे अस्तित्व केवळ छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आहे, असे प्रतिपादन माजी खासदार आणि नॅशनल शिपिंग बोर्डाचे चेअरमन प्रदीप रावत यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे शिवा काशीद, मुरारबाजी देशपांडे, सूर्याजी मालुसरे यांच्या जीवनाचा आणि कार्याचा वेध घेणारे सौरभ कर्डे लिखित आणि स्नेहल प्रकाशनाने प्रकाशित केलेले ‘हिंदवी स्वराज्याचे शिलेदार’ या पुस्तकाचे माजी खासदार प्रदीप रावत यांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी एस. पी. महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप शेठ, मोहन शेटे, पांडुरंग बलकवडे, स्नेहल प्रकाशनाचे संचालक रवींद्र घाटपांडे, पुस्तकाचे लेखक सौरभ कर्डे आदी उपस्थित होते.

यावेळी रावत म्हणाले की,  शिवरायांचा लढा केवळ राजकीय नव्हता तर तो सांस्कृतिक आणि धार्मिकही होता. हिंदुस्थानात सुरु असलेली पराभवांची शृंखला शिवरायांनी मोडून काढली. इतिहास केवळ आपल्या पराक्रमी पूर्वजांचे पोवाडे गाऊन त्यांच्या वैभवशाली पूर्वपुण्याईवर कर्तृत्वशून्य वर्तमान जगण्यासाठी नसतो. इतिहासाचे थेट वर्तमानाशी नाते असते, असे रावत यावेळी म्हणाले. 

रवींद्र घाटपांडे यांनी प्रास्ताविक केले, रवींद्र वडके आणि सहकार्‍यांनी गायिलेल्या ईशस्तवनानंतर कार्यक्रमाला सुरवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रसाद मोरे यांनी केले.