Mon, Mar 25, 2019 17:42होमपेज › Pune › सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, लघवी, शौच केल्यास दंड

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, लघवी, शौच केल्यास दंड

Published On: Sep 11 2018 1:40AM | Last Updated: Sep 11 2018 1:02AMपिंपरी : प्रतिनिधी

शहरातील सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास, उघड्यावर थुंकल्यास आणि शौच केल्यास 150 ते 500 रुपये दंड जागेवर (स्पॉट फाईन) करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या नव्या अध्यादेशानुसार ही कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अस्वच्छता न करता स्वच्छता ठेवण्यावर भर द्यावा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. 

राज्यातील सर्व महापालिकांमध्ये अस्वच्छता करणार्‍या नागरिकांवर किंवा संस्थांवर दंड आकारणीत सुसूत्रता येण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन नियम, 2016 च्या तरतुदीचे पालन न करणार्‍या व्यक्ती किंवा संस्थांवर दंडात्मक कारवाईचे अधिकार पालिकेस देण्यात आले आहेत. या संदर्भात दंडाची रक्कम नव्या अद्यादेशानुसार शासनाने  शुक्रवारी (दि.7) मंजूर केली आहे. त्याच्या तत्काळ अंमलबजावणीचे आदेश सर्व पालिकांना देण्यात आले आहेत.

सदर सुधारीत अध्यादेश पिंपरी-चिंचवड महापालिकेस  सोमवारी (दि.10) प्राप्त झाला आहे. त्यानुसार पालिका प्रशासनाने सर्व क्षेत्रीय कार्यालयांना प्रत्यक्ष अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. या अध्यादेशानुसार सार्वजनिक ठिकाणी आणि रस्ते व मार्गावर टाकाऊ पदार्थ, धूळ, कोणताही कचरा टाकून घाण केल्यास 180 रुपये दंड जागेवर केला जाणार आहे.  सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 150 रुपये दंड असणार आहे. तर उघड्यावर लघवी केल्यास 200 रुपये दंड मोजावा लागणार आहे. उघड्यावर शौच केल्यास 500 रुपये दंड भरावा लागणार आहे. 

पालिकेकडून अंमलबजावणी सुरू

राज्य शासनाचा सुधारित नवा अध्यादेश सोमवारी (दि.10) पिंपरी-चिंचवड महापालिकेस प्राप्त झाला आहे. त्यानुसार शहरात अस्वच्छता करणार्‍या व्यक्ती व संस्थांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यानुसार कारवाईची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी सांगितले.