Sat, Aug 24, 2019 21:20



होमपेज › Pune › डिजिटल इंडियाच्या नावावर बँकांकडून नागरिकांची प्रचंड लूट

डिजिटल इंडियाच्या नावावर बँकांकडून नागरिकांची प्रचंड लूट

Published On: May 27 2018 1:20AM | Last Updated: May 27 2018 12:50AM



पुणे : देवेंद्र जैन

एकीकडे डिजिटल इंडियाचा पुरस्कार करताना सरकार थकत नाही तर दुसरीकडे बँकांनी सामान्य नागरिकांना डिजिटलच्या नावाखाली मोठमोठे सर्व्हिस चार्ज लावत लुबाडण्याचे सत्र सुरू केल्याचे दिसत असून, बँकांच्या या अवाच्या सवा फीला नागरिक वैतागले आहेत.

देशातील बहुतेक सर्वच बँकांनी डिजिटल इंडिया प्रोग्रॅमचा विपर्यास करून, नागरिकांच्या खात्यातून वेगवेगळ्या नावांवर पैसे काढून घेण्याचा सपाटा लावला आहे. स्टेट बँक त्यांचे पासबुक इतर ठिकाणच्या त्यांच्याच बँकेच्या शाखेत भरून घेतल्यास 118 रुपये वसूल करत आहे. 

याबाबत त्या बँकेचे एक खातेदार धनुर्धर ठाकूर यांनी अतिशय कडवट प्रतिक्रिया ‘पुढारी’कडे व्यक्त केली.  ते म्हणतात, मी जळगावचा आहे व माझे तेथील स्टेट बँकेत खाते आहे. शिक्षणाकरिता मी पुणे शहरात राहतो. घरच्यांनी माझ्या खात्यात गावातून पैसे भरल्यास पैसे कापले जातात. मग डिजिटल इंडियाचा सर्वसामान्यांना फायदा काय? बँकांनी 2014 नंतर देशातील लाखो खातेदारांच्या खात्यातून कोट्यवधी रुपये अशा प्रकारे काढून घेतले आहेत. सरकारी बँका व्यवसाय करू शकत नाहीत, ती एक सेवा आहे. मात्र, बँक कर्मचार्‍यांना ‘स्पेशल’ वागणूक देणार्‍या या बँका ‘सेवा’धर्म विसरून ग्राहकांची अक्षरशः लूट करीत असल्याचा आरोपही ठाकूर यांनी केला.

कोअर बँकिंगमध्ये डिजिटलचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. नॉनहोम ब्रॅँचच्या नावावर वसूल केले जात असलेल्या शुल्काला रिझर्व्ह बँकेची कुठलीही मान्यता नाही. अनेक बँकांनी बुडीत कर्ज भरून काढण्यासाठी याच मार्गाचा वापर करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असा आरोप करण्यात येत आहे.

यासंदर्भात स्टेट बँकेचे विभागीय व्यवस्थापक मोहोंतो यांची प्रतिक्रिया विचारली असता, त्यांचे सचिव लक्ष्मीकांत देशमुख यांनी सांगितले की, ते प्रतिक्रिया देऊ शकत नाहीत. मीच माहिती देतो, असे सांगत बँक हा व्यवसाय आहे. हा व्यवसाय सुरू राहण्यासाठी वेगवेगळे शुल्क गोळा केले जाते. ते कोणा एकाकरिता वसूल केले जात नाही. तसेच आमच्या बँकेकडून वसूल केले जाणारे शुल्क हा व्यवसायाचाच भाग आहे. त्यावर रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण असते.