Tue, Mar 26, 2019 01:45होमपेज › Pune › पिंपरीत ४५ ठिकाणी ‘पब्लिक बायसिकल शेअरिंग’

पिंपरीत ४५ ठिकाणी ‘पब्लिक बायसिकल शेअरिंग’

Published On: Jul 30 2018 1:31AM | Last Updated: Jul 30 2018 1:05AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीत पिंपळे सौदागर, वाकड व पिंपळे गुरव येथील बीआरटीएस मार्गावरील 45 ठिकाणी ‘पब्लिक बायसिकल शेअरिंग’ (सार्वजनिक सायकल सुविधा) योजना उपक्रम 15 ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे. या योजनेत महापालिका व स्मार्ट सिटी कंपनी कोणतीही आर्थिक गुंतवणूक करणार नाही. संबंधित प्रायोजक सायकल कंपन्या त्याचे नियोजन, नियंत्रण व देखरेख करणार आहे. 

पिंपरी-चिंचवड शहराचा स्मार्ट सिटीत समावेश झाला आहे. त्यानुसार पालिका शहरातील पिंपळे सौदागर व पिंपळे गुरव या ‘एरिआ बेस डेव्हलपमेंट’ (क्षेत्रीय पायाभूत सुविधा) परिसरात आणि ‘पॅन सिटी’ अंतर्गत विविध योजना राबवित आहे. त्यातील पहिला उपक्रम ‘एरिआ बेस डेव्हलपमेंट’ परिसरातील ‘पब्लिक शेअर सायकल’ हा आहे. त्यासाठी सुमारे 4 सायकल कंपन्या उत्सुक आहेत. 

स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासोबत 3 जुलैला बैठक झाली. त्यात या योजनेसंदर्भात अटी व शर्ती निश्चित करण्यात आल्या आहेत. पुणे स्मार्ट सिटी लिमिटेडच्या धर्तीवर ही योजना प्रायोजक तत्त्वावर शहरात राबविली जाणार आहे. पालिका किंवा स्मार्ट सिटी त्यासाठी कोणतीही आर्थिक गुंतवणूक करणार नाही. पालिका केवळ जागा उपलब्ध करून देणार आहे. 

सायकल कंपन्या स्वखर्चाने सायकल पुरवून, देखभाल व दुरुस्ती करणार आहेत. रात्रीच्या वेळी सायकल चालकाने इतर ठिकाणी सोडून दिलेल्या सायकली गोळा करण्याची जबाबदारी प्रायोजकाची आहे. सायकल वापरण्याचा भाडे दर ठरविण्याचा आणि त्यात वाढ व घट करण्याचा अधिकार प्रायोजकास देण्यात आला आहे. हा करार 5 वर्षांसाठी आहे. तक्रारी निवारणाची जबाबदारी कंपनीची असणार आहे.सायकलस्वाराचा अपघात झाल्यास त्याची जबाबदारी प्रायोजक कंपनीची राहणार आहे. इच्छुक प्रायोजक कंपन्यांशी करार करण्यास मान्यता देण्याचा विषय बुधवारी (दि.1) होणार्‍या स्थायी समिती सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.