Mon, Aug 19, 2019 00:40होमपेज › Pune › ‘पब्लिक बायसिकल शेअरिंग ’ १५ ऑगस्टला सुरू 

‘पब्लिक बायसिकल शेअरिंग ’ १५ ऑगस्टला सुरू 

Published On: Jul 10 2018 1:03AM | Last Updated: Jul 10 2018 1:03AMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात पुणे स्मार्ट सिटीप्रमाणे ‘पब्लिक बायसिकल शेअर सिस्टीम’ योजना राबविण्यात येत आहे. ‘एरिया बेस डेव्हल्पमेंट’अंतर्गत पिंपळे सौदागर येथे प्रायोगिक तत्वावर ही योजना येत्या 15 ऑगस्टला सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 200 सायकल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 

शेअर बायसिकल योजनेसंदर्भात नुकतीच आयुक्तांच्या दालनात बैठक झाली. या वेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, शहर अभियंता अंबादास चव्हाण, अय्युब खान पठाण, सहशहर अभियंता राजन पाटील, मुख्य माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख निलकंठ पोमण तसेच, युलू, पेडेल, मोबीक, मोबीसिक या सायकल कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

पुणे शहराच्या धर्तीवर ही योजना राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात पालिका केवळ मोफत जागा उपलब्ध करून देणार आहे. बीआरटीएस बस थांबे, पालिका क्षेत्रीय कार्यालय, इतर कार्यालये, शाळा, रूग्णालय आदी ठिकाणे सायकलचे थांबे असणार आहेत. कंपन्यांकडून सायकल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सायकली भाडे तत्वावर नागरिकांना वापरता येणार आहेत. त्यासाठी वापरकर्त्यांना संबंधित सायकल कंपनीचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करून घ्यावे लागणार आहे. सायकलचे भाडे मोबाईल अ‍ॅपद्वारेच अदा करता येईल. हा उपक्रम पहिल्या टप्प्यात 5 वर्षांसाठी राबविला जाणार आहे. 

पहिल्या टप्प्यात हा उपक्रम पिंपळे सौदागर परिसरात सुरू करण्यात येणार आहे. सदर सायकल कंपनीतर्फे सायकलचे थांबे हाउंसिग सोसायट्यांमध्येही असणार आहेत. या संदर्भात पालिका व कंपनी सामंजस्य करार करून त्या उपक्रमाचे सुरूवात करण्यात येणार आहे. 

आयुक्त हर्डीकर यांंनी संबंधित कंपन्यांना सूचना केल्या आहेत. सायकल बालक, तरूण महिला व वृद्धांना चालविता येईल, असा पद्धतीने असाव्यात. त्याचे वजन कमी असावे. मोबाईल अ‍ॅपवर हाताळणी सुलभ असावे. त्या सहजपणे सर्वत्र उपलब्ध व्हाव्यात. त्यासाठी कमीत कमी भाडे आकारले जावे. त्यास संबंधित कंपनीने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. 

सौरऊर्जेतून वीजनिर्मिती उपक्रम

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालय, पालिका भवन, जलशुद्धीकरण केंद्र आदी ठिकाणी सौरऊर्जा पॅनेल बसविण्यात येणार आहेत. त्यातून वीजनिर्मिती केली जाणार आहे. त्या संदर्भातील प्रस्ताव पालिकेच्या विद्युत विभागातर्फे स्थायी समितीनंतर सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. दरम्यान, पालिका शाळांमध्ये ‘ई-लर्निंग’ योजना सुरू करण्याबाबत आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे.