Sat, Jul 20, 2019 02:12होमपेज › Pune › दृष्टिदान दिन : ८५ दृष्टिहीनांचे आयुष्य केले प्रकाशमय

दृष्टिदान दिन : ८५ दृष्टिहीनांचे आयुष्य केले प्रकाशमय

Published On: Jun 10 2018 1:49AM | Last Updated: Jun 10 2018 12:26AMपिंपरी : वर्षा कांबळे

नेत्रदानाबद्दल जनजागृती होऊनही आजही नेत्रदानाकडे नागरिकांचा कल नाही. नेत्रदानासाठी रुग्णालयाकडून व  संस्थांकडून नेत्रदान करण्याचे आवाहन केले जाते. मात्र, काही वेळा नेत्रदात्यांच्या मृत्यूनंतर नातेवाईकांचा विरोध होतो. नेत्रदान ही चळवळ बनविणे काळाची गरज आहे. यासाठी चार वर्षापूर्वी भोसरी येथे राम फुगे यांनी जागृती सोशल फाउंडेशनची स्थापना केली. संस्थेने आतापर्यंत 85 दृष्टिहीनांना दृष्टी देऊन त्यांचे जीवन प्रकाशमय केले आहे. प्रत्येक सुजाण नागरिकाने मरणोत्तर नेत्रदान करण्याची स्वेच्छेने तयारी ठेवली पाहिजे हा विचार आज (दि.10) दृष्टिदानदिनी होणे गरजेचे आहे. 

जागृती फाउंडेशनच्या उद्घाटनाप्रसंगी राम फुगे व त्यांच्या सहकार्‍यांनी दत्ता काळढोके या दृष्टिदान मिळालेल्या विद्यार्थ्यास बोलावले होते. कोणीतरी नेत्रदान केल्यामुळेच त्यांचे आयुष्य प्रकाशमय झाले होते. दहावीत त्याने 74 टक्के गुण मिळवून तो आता सिम्बायोसिस महाविद्यालयात शिकत आहे.  नेत्रदान केले तर एखाद्याचे आयुष्य आपण किती बदलू शकतो. आपल्या प्रत्येकाकडे दोन दृष्टिहीन व्यक्तीचे जीवन बदलण्याचे सामर्थ्य आहे. 

नेत्रदानाचे महत्त्व ग्रामीण व शहरी भागाला पटलेलेच आहे. मात्र, समस्या आहे ती प्रत्यक्ष नेत्रदान होण्याची. बहुतांश व्यक्तींनी नेत्रदानाचे अर्ज भरले आहेत. परंतु, त्यांच्या मृत्युपश्‍चात नेत्रदान होतेच असे नाही. कारण त्या व्यक्तीने नेत्रदान करण्याची इच्छा दर्शविली आहे हे त्याच्या कुटुंबियांना माहिती नसते. जर माहिती असेल तर त्या क्षणी काय केले पाहिजे हे सुचत नाही किंवा ज्याने अर्ज भरला त्याची त्या क्षणी घरी जाऊन कुटुंबातील व्यक्तींची माहिती घेण्याची मन:स्थिती नसते. 

आजदेखील पुण्यातील ससून रुग्णालयात नेत्रदानाचे लाखो अर्ज आले आहेत. परंतु, प्रत्यक्षात नेत्रपेढीला 30 हजार नेत्रांची गरज असताना महिन्याला 10 ते 20 नेत्रदान होतात. पिंपरी चिंचवड शहरात तर हे प्रमाण यापेक्षाही कमी आहे. ही समस्या लक्षात घेऊन संस्थेने प्रामुख्याने नेत्रदानाबद्दल जागृतीचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी संस्थेचे सर्व सहकारी वेगवेगळ्या पद्धतीने काम करत आहेत. संस्थेने नेत्रदान जनजागृतीच्या माध्यमातून आत्तापर्यंत 85 दृष्टिहीन व्यक्तींना दृष्टी दिली आहे.

अनेकजण नेत्रदान करण्याचे ठरवितात. प्रत्यक्षात मात्र होत नाही. कारण त्यांच्या कुटुंबीयांना त्याची माहिती नसते. व्यक्तीच्या कुटुंबीयांना नेत्रदानाबद्दल कळावे म्हणून आम्ही नेत्रदानास इच्छुक असलेल्या व्यक्तींकडून एक स्टिकर असलेले शपथपत्र तयार करून घेतो. ते पत्र त्यांच्या घरी दिले जाते. जेव्हा त्या व्यक्तीचा मृत्यू  होतो तेव्हा त्याच्या कुटुंबीयांना त्या स्टिकरमुळे नेत्रदान करण्याची आठवण होते. त्यामुळे नेत्रदानास इच्छुक व्यक्तीने घरच्यांना सांगून ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे.  - राम फुगे, (संस्थापक, जागृती सोशल फाउंडेशन)