Fri, Apr 26, 2019 00:16होमपेज › Pune › ‘पब्लिक बायसिकल शेअरिंग’ सेवा योजना 

‘पब्लिक बायसिकल शेअरिंग’ सेवा योजना 

Published On: Mar 23 2018 1:59AM | Last Updated: Mar 23 2018 1:33AMपिंपरी : प्रतिनिधी

पुणे शहरात ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘पब्लिक बायसिकल शेअरिंग’ सेवा योजनेस मोठा प्रतिसाद लाभला आहे. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवड ‘स्मार्ट सिटी’तही ‘सायकल शेअरिंग’ योजना राबविण्यात येणार आहे. 

या संदर्भातील प्राथमिक बैठक गुरुवारी (दि. 22) महापालिका भवनातील आयुक्त दालनात झाली. या वेळी ‘स्मार्ट सिटी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्‍त श्रावण हर्डीकर, सहमुख्य कार्यकारी अधिकारी नीलकंठ पोमण, कार्यकारी अभियंता, अधिकारी आणि पुण्यात राबवीत असलेल्या ‘सायकल शेअरिंग’ कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

सायकल कंपनीच्या प्रतिनिधींनी ‘सायकल शेअरिंग’संदर्भात सादरीकरण केले. ‘स्मार्ट सिटी’साठी, पर्यावरणपूरक शहरासाठी आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी सायकल वापरणे फायदेशीर असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे शहरात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, कृषी महाविद्यालय, औंध, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड, काही हौसिंग सोसायट्या आदी ठिकाणी सुरू केलेल्या ‘सायकल शेअरिंग’ उपक्रमास मोठा प्रतिसाद लाभला आहे. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत हा उपक्रम राबविण्याची संकल्पना कंपनीच्या प्रतिनिधींनी मांडली. 

शहरात प्रायोगिक तत्त्वावर हिंजवडी, पिंपळे सौदागर आणि वाकड या परिसरात ही योजना सुरू करण्याचा मानस आहे; तसेच प्राधिकरण, आकुर्डी या परिसरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याने त्या भागांत या उपक्रमास अधिक प्रतिसाद मिळू शकतो, अशी चर्चा झाली. शहरातील सायकलींसाठी चांगल्या व सोईस्कर अशा ठिकाणच्या स्थानकांचा सर्व्हे करण्याच्या सूचना आयुक्त हर्डीकर यांनी अभियंत्यांना दिल्या आहेत. 

सायकल कंपनीच्या सध्याच्या योजनेत केवळ सायकलचे भाडे ‘पेटीएम’ने  अदा करण्याची सुविधा उपलब्ध आहे. ‘पेटीएम’सह इतर सर्व मोबाईल अ‍ॅप अणि एमटीएमद्वारे अदा करण्याची सुविधा देण्याची सूचना आयुक्तांनी सायकल कंपनीच्या प्रतिनिधींना केली. महिला व पुरुष, तरुण आणि बालक अशा विविध वयोगटांनुसार सायकलींचा आकार असावा. तसेच, इतर आवश्यक बाबींसंदर्भात प्रतिनिधींना सूचना केल्या गेल्या. 

अशी आहे योजना...

‘सायकल शेअरिंग’ योजनेत सदर सायकल कंपनीचे अ‍ॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करावे लागते. मोबाईलद्वारे सायकलच्या मडगार्डवरील स्कॅन करून ‘लॉग इन’ केल्यास त्याचे टाळे उघडते. सायकलचा वापर झाल्यानंतर ती जवळच्या स्थानकावर लावून पुन्हा मोबाईल अ‍ॅपने स्कॅन करून ‘लॉग आऊट’ केल्यास टाळे लागते. त्या दरम्यान, संबंधित भाडे ‘पेटीएम’मधून वजा केले जाते. त्यासाठी वापरकर्त्यांच्या मोबाईलमध्ये संबंधित सायकल कंपनीचे आणि ‘पेटीएम’चे अ‍ॅप असणे आवश्यक आहे.

शहरात सायकल ट्रॅक नसल्याने अडचण

शहरात सर्व मार्गांवर सायकल ट्रॅक नाहीत. तसेच, मुख्य रस्त्यावर काही ठिकाणी निर्माण केलेल्या सायकल ट्रॅकची दयनीय अवस्था आहे. शहरात प्रशस्त रस्ते असूनही त्यावर झालेल्या अतिक्रमणांमुळे ते अपुरे पडून वाहतूक कोंडीत  भर पडत आहेत. त्यामुळे ‘सायकल शेअरिंग’ योजना राबविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. रस्त्यावर सायकल ट्रॅक तयार करण्याचे आव्हान पालिकेस पेलावे लागणार आहे. तसेच, शहरात सायकल वापर वाढीसाठी सायकलप्रेमींचा क्‍लब स्थापन करून या उपक्रमास चालना देण्यासाठी स्वयंसेवी संस्था आणि संघटनांचे साह्य घ्यावे लागणार आहे. 

 

Tags : pune, pune news, Public bicycle Sharing Services, Public Response,