Tue, Mar 19, 2019 09:39होमपेज › Pune › पब...रात्रीस खेळ चाले...!

पब...रात्रीस खेळ चाले...!

Published On: Aug 14 2018 1:06AM | Last Updated: Aug 14 2018 12:33AMपुणे : प्रतिनिधी  

सांस्कृतिकतेचा टेंबा मिरविणार्‍या पुण्यात उच्चभ्रू अन् बड्या आसामींच्या दिवट्यांनी सुरू केलेला पबमधील धांगडधिंगा शहराच्या वारश्याला गालबोट लावत आहे. बिनधास्तपणे हजारोंच्या संख्येने ही तरुणाई मद्याच्या नशेत थिरकत असून, दिवसेंदिवस हे चित्र भयावह रूप धारण करत आहे. विशेषत: रात्री-अपरात्रीचा थिल्लरपणा सर्वसामान्यांना त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे विविध रूपांनी नटलेल्या शहराला काळिमा फासण्याचा जणूकाही ठेकाच या पब संस्कृतीने घेतला आहे की, काय असा प्रश्‍न पुणेकरांना पडला आहे. अवघ्या तीन तासांच्या पोलिस कारवाईत तब्बल 7 ते 8 हजार पब बहाद्दांराना तंबी देऊन सोडण्यात आले. त्यामुळे हे प्रमाण किती मोठे आहे हे एका कारवाईवरून स्पष्ट झाले आहे. पुणे म्हटलं की, डोळ्यासमोर चित्र उभे राहते ते शिक्षण, नोकरी, व्यवसाय, आयटी हब आणि नवी उभारी तसेच आयुष्य उज्ज्वल करण्याचे हक्काचे ठिकाण. मागील काही वर्षात शहराची लोकसंख्या जवळपास 60 लाखांपर्यंत पोहचली आहे.

विशेषकरून शिक्षण आणि नोकरीसाठी देशभरातून शहराकडे धाव घेणार्‍या तरुणाईची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच आयटी हबने वातावरण आपसूकच तरुणांना पाश्‍चात्य सांस्कृतीकडे घेऊन जात आहे. त्यामुळे बड्या-बड्या हॉटेलमध्ये रात्री उशिरापर्यंत कायद्याचे उल्लंघन करून पार्ट्यांच्या नावाखाली बिभत्सपणा सुरू आहे. विकेंडची पार्टी साजरी करण्यासाठी सुरुवात होते, ती शुक्रवारपासून. विशेष म्हणजे, खास त्यासाठी शहरातूनच नव्हे तर बाहेरूनही मोठ्या प्रमाणात तरुणाई येत असल्याचे वास्तव अनेकवेळा समोर आले आहे. 

कुटुंब सोबत राहत नसल्यामुळे धाक आणि विचारणा नाही. पाश्‍चात्य सांस्कृतीचे अनुकरण, मित्रांचा आग्रह, खुळखुळणारा अतिपगार तसेच स्टेट्स यासर्व कारणांमुळे पबची संख्या  आपसूकच वाढत चालली आहे. आजमितीला शहरात जवळपास 18 ते 20 पब आहेत. दोन दिवसांपूर्वीच पुणे पोलिसांनी एकाच वेळी विविध भागातल्या तबल 12 पब आणि हुक्कापार्लरवर कारवाई केली. या वेळी चक्क 7 ते 8 हजार तरुण-तरुणी असल्याचे आढळून आले. पबमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात झिंगाट तरुणाई पाहून पोलिसही चक्रावून गेले. दरम्यान, सुटीच्या दिवशी पब आणि इतर ठिकाणी तरुणाई किती असेल याची कल्पनाही करवत नाही. परंतु, गेल्या काही वर्षात शहरात पबमधील संख्या वाढल्याचे एका अधिकार्‍याने मान्य केले. 

नियमानुसार दीडपर्यंतच सुरू

नियमानुसार पब तसेच हॉटेल्स रात्री दीडपयर्र्ंत सुरू ठेवता येतात. त्यानंतर हे बंद झाले पाहिजे. मात्र, झिंगलेल्या तरुणाईच्या मागणीखातर दीडनंतर काही तास सुरूच ठेवण्यात येतात. परंतु, गाण्यांच्या मोठ्या आवाजामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो.  त्यानंतर ही तरुणाई बेधुंद अवस्थेत घराकडे रवाना होते. 
अनेकवेळा बाहेर पडल्यानंतरही रस्त्यांवर यांचा धांगडधिंगा सुरू असतो. तसेच या मुळे अपघातालाही निमत्रंण मिळते. 

पब म्हणजे काय रे भाऊ...

पंचतारांकित हॉटेलमध्ये शौकिन तरुणांसाठी पब हे गोंडस नाव देऊन स्वंतत्र विभाग तयार केलेला असतो. त्याठिकाणी मद्य, हुक्का आणि मोठ्या आवाजातील संगीत तरुणाईला ठेका धरायला लावते. कोणी मद्याच्या अंमलात थिरकते तर, कोणी दुसर्‍याला थिरकताना पाहून मद्य रिचवते. बहुतांश वेळा रात्री 12 वाजता सुरू झालेले हे पबमधील चित्र पहाटे चार वाजेपर्यंत सुरू असते. इथं प्रवेश घेण्यासाठी खास पासेसची सोय असते. पुण्यात 2 ते 5 हजारांपर्यंत प्रवेश दिला जातो. यातील गुपित म्हणजे, तरुणाई वाढली की प्रवेशाची किंमतही वाढते. विशेष म्हणजे, येथील दारू व जेवण हे चढ्या दराने विकले जाते. पबमध्ये नाचण्यासाठी मुली असतात. काही पबमध्ये तरुणाला आत जातेवेळी हातावर शिक्केही मारले जातात. हिंदी आणि इंग्रजी गाणे वाजविले जातात. सैराटसारखी फेमस गाणीही कधी-कधी इथे राज्य करून जातात.