होमपेज › Pune › सफाई कर्मचार्‍यांना सुरक्षासाधने पुरवा

सफाई कर्मचार्‍यांना सुरक्षासाधने पुरवा

Published On: May 07 2018 2:04AM | Last Updated: May 07 2018 12:48AMपिंपरी : प्रतिनिधी 

नालेसफाई करणार्‍या कर्मचार्‍यांना सुरक्षासाधने पुरवा. बॉयलर सूट द्या. अतिआवश्यक सेवेसाठी त्याचा वापर करता येईल.  त्यांना कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही, याची काळजी घ्या, अशा सूचना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अधिकार्‍यांना केल्या. 

आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आरोग्य तक्रार निवारण समितीसोबत नुकतीच बैठक घेतली. नालेसफाई कर्मचार्‍यांना सुरक्षा साधने पुरविली जात नाहीत, या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीमध्ये आयुक्तांनी या सूचना केल्या. या बैठकीमध्ये सफाई कर्मचार्‍यांच्या सुरक्षासाधनांचा आढावा घेण्यात आला. सर्व सफाई कर्मचार्‍यांनी काम करतेवेळी सुरक्षा साधने देणे गरजेचे असल्याचे समितीच्या सदस्यांनी सांगितले. नाले सफाई करताना बॉयलर सूट द्यावीत जेणेकरून कर्मचार्‍यांना कोणतीच इजा होणार नाही. सर्व क्षेत्रीय अधिकार्‍यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. लाड-पागे समितीच्या प्रकरणांबरोबरच सेवानिवृत्तीची प्रकरणेही प्रलंबित आहेत. ही प्रकरणे 15 दिवसांत निकाली काढावीत अशा सूचनाही यावेळी आयुक्तांनी केल्या.

नाल्यामध्ये ड्रेनेजचे पाणी मिसळले जाते. त्यामुळे पाणी शुद्धिकरणाची क्षमता वाढविणे गरजेचे आहे. सफाई कर्मचार्‍यांची अनेक पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे त्वरित भरावीत, अशी मागणी यावेळी समितीच्या सदस्यांनी केल्या. याबरोबरच प्रभाग स्तरावर सफाई कर्मचारी काम करीत असताना सफाई कर्मचारी पुनवर्सन कायदा 2013 च्या अनुषंगाने काम करावीत आदी सुचना या वेळी करण्यात आल्या. या बैठकीस आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त, आरोग्य कार्यकारी अधिकारी, कामगार कल्याण अधिकारी सहायक आयुक्त, आरोग्य तक्रार निवारण समितीचे उपाध्यक्ष ऍड. सागर चरण, बबन झिंजुर्डे, डॉ. माधुरी माछरे, सुनील चावरे आदी उपस्थित होते.