Mon, Jun 17, 2019 02:14होमपेज › Pune › पुणे : ‘भाजपचा जलवा, गाजर हलवा’

पुणे : ‘भाजपचा जलवा, गाजर हलवा’

Published On: Mar 21 2018 2:10AM | Last Updated: Mar 21 2018 2:10AMपुणे : प्रतिनिधी

भाजपचा जलवा गाजर हलवा, पुणेकरांना फसविणार्‍या गाजर पार्टीचा धिक्‍कार असो, ‘अरे या फसव्या सत्ताधार्‍यांचे करायचे काय, खाली डोकं वर पाय’, अशा घोषणाबाजीने महापालिका भवन दणाणून सोडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गाजर हलवा वाटून पालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या सत्तेचा निषेध केला. 

महापालिकेत भाजपची सत्ता येऊन गुरुवारी एक वर्ष पूर्ण झाले. वर्षभरात भाजपने केलेल्या कारभाराचा निषेध करण्यासाठी मनसेच्या वतीने शुक्रवारी महापालिका भवनात गाजर हलवा वाटप केला. या वेळी पालिकेतील मनसेचे गटनेते वसंत मोरे, नगरसेवक साईनाथ बाबर, माजी नगरसेविका रूपाली ठोंबरे, युगंधरा चाकणकर, राहुल तुपेरे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. हातामध्ये मनसेचा झेंडा, गळ्यात पट्टी घालून पदाधिकार्‍यांनी व कार्यकर्त्यांनी पालिका भवनातील सर्व विभागांमध्ये जाऊन अधिकारी, कर्मचारी यांच्यासह कामानिमित्त पालिकेत आलेल्या नागरिकांना गाजराचा हलवा देऊन सत्ताधार्‍यांचा निषेध केला. या वेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनांपैकी कोणतेही आश्वासन पूर्ण केले नाही. जनतेची दिशाभूल करण्याचे आणि फसव्या योजना जाहीर करण्याचेच काम सत्ताधार्‍यांनी आजवर केले आहे. पुणेकरांनी अत्यंत विश्वासाने विकासासाठी पालिकेत भाजपला सत्ता दिली; मात्र त्यांनी जनतेला गाजर दाखविण्याचे काम केल्याचा आरोप या वेळी मनसे पदाधिकार्‍यांनी केला.

Tags : pune, pune news, Protest, against, power, Bharatiya Janata Party, Municipal Corporation