Thu, Feb 21, 2019 23:21होमपेज › Pune › ‘क्रीडा’ला कामगिरीपेक्षा ‘प्रस्ताव’ महत्त्वाचा

‘क्रीडा’ला कामगिरीपेक्षा ‘प्रस्ताव’ महत्त्वाचा

Published On: Feb 15 2018 1:57AM | Last Updated: Feb 15 2018 1:17AMपुणे : प्रतिनिधी 

महाराष्ट्र केसरी मल्‍लसम्राट कुस्ती स्पर्धेमध्ये दौंड तालुक्यातील वरवंड येथील महिला कुस्तीपटू मनीषा दिवेकर हिने महिलांच्या कुस्तीत प्रथम क्रमांक पटकावीत विजय मिळविला. परंतु तिच्या या विजयाकडे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेबरोबरच शासनाने पाठ फिरविली आहे. दिवेकरचा प्रस्ताव सादर केल्यास नक्‍कीच तिला मदत करू, असे आश्‍वासन जिल्हा क्रीडा अधिकार्‍यांनी दिले आहे.

ग्रामीण भागातून कुस्ती क्षेत्रात पुढे येऊन मोठे यश संपादन करणारी मनिषा दिवेकर हिला क्रीडा विभाग आणि शासनाकडून वाटाण्याच्या अक्षदा मिळालेल्या आहेत. नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेच्या वतीने मल्‍लसम्राट महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या संघटनेला महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची मान्यता नसल्याने व ही निमंत्रित स्पर्धा असल्याने तेथे सहभागी मल्‍लांकडे शासनानेही दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

मनिषा दिवेकर हिने आत्तापर्यंत राज्यपातळीवर 16 तर राष्ट्रीय पातळीवर 17 सुवर्णपदके मिळविलेली आहे. घरची परिस्थिती हालाखीची असतानाही हे यश तिने संपादन केले आहे. मनिषाच्या या कामगिरीची दखल महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेच्या वतीने घेणे अपेक्षित होते. परंतू, संघटना आणि संघटनेतील इतर पदाधिकारी यांना त्याचे गांभीर्यच नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.