Sat, Jul 20, 2019 15:02होमपेज › Pune › चांगी कंपनीकडून लवकरच पुरंदर विमानतळाचा प्रस्ताव

चांगी कंपनीकडून लवकरच पुरंदर विमानतळाचा प्रस्ताव

Published On: Feb 20 2018 1:55AM | Last Updated: Feb 20 2018 1:03AMपुणे : दिगंबर दराडे

पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देशातील सर्वात मोठा कार्गो विमानतळ होणार असल्याने, त्या ठिकाणी कोणकोणत्या सोयीसुविधा असाव्यात याकरिता राज्य शासनाला प्रस्ताव पाठविण्याच्या हालचाली ‘चांगी’कडून सुरू करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीचे (एमएडीसी) व्यवस्थापकीय संचालक सुरेश कंकाणी यांनी दिली. 

सिंगापूर सरकारशी झालेल्या कराराअंतर्गत पुरंदर विमानतळासाठी ‘चांगी’ कंपनीच्या सहकार्याने ‘स्पेशल पर्पज व्हेईकल’ कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. त्या संदर्भातदेखील हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानासाठी व प्रवासी सुविधांबाबत अग्रस्थानी असलेल्या ‘चांगी’ विमानतळाचे तंत्रज्ञ पुरंदर विमानतळासाठी काम करणार आहेत. सिंगापूरच्या ‘चांगी’ विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष लुई मून लेओंगशी यांच्याशी राज्य सरकारची चर्चा सुरू असल्याची माहिती कंकाणी यांनी दिली. 

चांगी विमानतळाच्या तज्ज्ञांकडून लवकरच राज्य सरकारला पुरंदर विमानतळासाठी सोयीसुविधा, नियोजन, तांत्रिक बाबींसंदर्भात प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. पुरंदर विमानतळासह शिर्डी आणि नागपूर विमानतळांच्या विस्तारासंदर्भातदेखील त्यांचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. सिंगापूरचा चांगी विमानतळ आशियातील एक महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय वाहतूक केंद्र आहे. सोयी व सुविधांच्या दृष्टीने चांगी विमानतळ जगात सर्वोत्तम समजला जातो. सिंगापूर एअरलाइन्स या विमान वाहतूक कंपनीचे मुख्यालय व संचालन केंद्र चांगी विमानतळावर आहे. विमानतळ बांधणी आणि त्यानंतरचे संचालन याबाबत चांगी विमानतळ कंपनीचे निकष उच्च दर्जाचे आहेत. ‘स्पेशल पर्पज व्हेईकल’ स्थापन झाल्यानंतर पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा विमानतळ उभारणीसाठी ‘चांगी’चा मोठा हातभार लागेल.

पुरंदरच्या जागेचा तांत्रिक आणि आर्थिक अहवाल ‘डॉर्श’कडून सादर केला जाणार आहे. यामध्ये पुरंदरच्या प्रस्तावित जागेची व्यवहार्यता, विविध स्वरूपाचे सर्वेक्षण, भविष्यातील विमान उड्डाणांची संभाव्य संख्या, विमानतळाचा मास्टर प्लॅन, आर्थिक आराखडा, पर्यावरण आघात मूल्यांकन अशा विविध स्वरूपातील संकलित माहिती या अहवालाद्वारे सादर केली जाणार आहे. त्यामुळे हा सविस्तर अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुरंदरच्या विमानतळाला खर्‍या अर्थाने गती मिळण्याची चिन्हे आहेत.

बर्लिन, बँकॉक आणि कुवेत यांसारख्या जागतिक स्तरावरील महत्त्वाच्या विमानतळांचा अहवाल ‘डॉर्श’ने तयार केला होता. त्यामुळे पुरंदरच्या विमानतळाचा अहवाल परिपूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाचे (डीपीआर) काम अखेरच्या टप्प्यात असून, लवकरच हा अहवाल महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला (एमएडीसी) प्राप्त होणार आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन आणि इतर प्रक्रियांना सुरुवात होणार आहे.