Fri, Jul 19, 2019 07:08होमपेज › Pune › पुरंदर विमानतळ जमीन संपादनाच्या प्रस्तावाला लवकरच मान्यता : शिवतारे

पुरंदर विमानतळ जमीन संपादनाच्या प्रस्तावाला लवकरच मान्यता : शिवतारे

Published On: Jan 28 2018 1:37AM | Last Updated: Jan 28 2018 1:13AMपुणे : प्रतिनिधी

पुरंदर येथील नियोजित विमानतळाबाबत हवाई दलाचा हिरवा कंदील मिळाला, त्यामुळे आता आवश्यक असलेल्या 2,800 हेक्टर जमिनीचे संपादन केले जाईल. विमानतळ प्राधिकरणाने जमिनीच्या भूसंपादनाचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला आहे. या प्रस्तावाला पुढील आठवड्यात मान्यता मिळेल, अशी माहिती जलसंपदा, जलसंधारण व संसदीय कार्य राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

संरक्षण विभागाने आक्षेप घेतल्याने अनेक दिवसांपासून पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाची मान्यता रखडली होती. परंतु 23 जानेवारीला संरक्षण विभागाने विमानतळ प्राधिकरणाला ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. सुरुवातीपासूनच शेतकर्‍यांना पुढे करून राजकीय हेतूने विरोध केला जात असून विमानतळ झाल्यानंतर राजकीय नुकसान होईल, अशी भीती विरोधकांना वाटत असल्याचा टोला शिवतारे यांनी लगावला आहे. 

विमानतळाच्या भूसंपादनापोटी संबंधितांना निर्वाह भत्त्यासह विकसित भूखंडाचा परतावा देणे, जमिनीच्या बदल्यात पर्यायी जमीन देणे, कोची विमानतळाच्या धर्तीवर विमानतळ विकास कंपनीत जमीन मालकाला भागधारक करून घेणे असे पर्याय सुचवण्यात आले होते. या पर्यायातून एक पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य बाधित जमीनधारकांना देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. मुंबई ते नागपूर मार्गावर होत असलेल्या समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादन करण्यासाठी सरळ खरेदीचा पर्याय वापरण्यात आला आहे. त्याच धर्तीवर  सरळ जमिनमालकाला पाच पट किंमत देऊन जमीन संपादित केली जाणार असल्याचे शिवतारे यांनी सांगितले.

गुंजवणी पहिला पथदर्शी प्रकल्प

वेल्हा तालुक्यातील गुंजवणी धरणाची क्षमता पावणेचार टीएमसी आहे. या धरणामुळे भोर, वेल्हा आणि पुरंदर तालुक्यातील सुमारे 28 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. कालव्याऐवजी बंद पाईपलाईनद्वारे पाणी वितरीत केले जाणार आहे. धरण व लाभक्षेत्रातील उंचीचा वापर करून पाण्याचा दाब निर्माण करण्यात आला असून त्याद्वारे पाणी उपलब्ध होणार आहे. 365 दिवस आणि 24 तास विजेशिवाय शेतकर्‍यांना पाणी उपलब्ध होणार आहे, असे शिवतारे यांनी सांगितले.  

उरुळी देवाची येथील पाण्याचा प्रश्‍न सुटणार

फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथे पाणीपुरवठा योजना राबविली जाणार असून, त्यासाठी सुमारे 73 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तुकाई टेकडीवर 38 लाख लिटर क्षमतेच्या दोन टाक्या बांधण्यात येणार आहे. त्यानंतर गंगानगर, फुरसुंगी गावठाण आणि उरुळी देवाची परिसरात पाण्याच्या टाक्या बांधण्यात येणार आहेत. या योजनेचे काम वेगाने सुरू होत आहे. सध्या 5 किमी लांबीच्या पाण्याच्या पाईपलाईन खोदाईचे काम सुरू आहे. या योजनेमुळे फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील पाण्याचा प्रश्‍न सुटणार आहे.